Image Source:(Internet)
नागपूर : एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या वेळी गुवाहाटीतून परतण्याचा निर्णय घेतलेल्या आमदाराला संपवण्याचा कट रचण्यात आला होता, असा खळबळजनक दावा शिवसेना (ठाकरे गटाचे) आमदार नितीन देशमुख Nitin Deshmukh यांनी केला आहे. शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी बंडाच्या काळात एका आमदाराचे ‘राम नाम सत्य’ होणार होते, असे वक्तव्य केल्यानंतर देशमुख यांनी या विधानावरून गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.
‘आमचा राम नाम सत्य करणारा कोण? संजय शिरसाट यांनी सांगितले की, एका आमदाराचे राम नाम सत्य होणार होते. मग ते आमचेच का होणार होते? आम्ही पक्षाशी प्रामाणिक राहिलो म्हणून आमचा जीव घेण्याचा कट होता का?’ असा सवाल नितीन देशमुख यांनी केला. गुवाहाटीतून परतल्यानंतर शिंदे गटातील एका आमदाराने दिल्लीवरून फोन आला होता आणि अटॅक झाल्याचे सांगून देशमुख यांना संपवण्याचा कट रचला जात असल्याची माहिती दिल्याचा दावा त्यांनी केला.
‘मारनेवाला भगवान, बचाने वाला भगवा. हा माझा पुनर्जन्म आहे. माझे राम नाम सत्य सुरतमध्येच होणार होते. दिल्लीतून नेमका कोणाचा फोन आला होता, याची माहिती मला नाही. शिरसाटही म्हणतात की राम नाम सत्य होणार होते. आता त्यांनीच स्पष्ट करावे की नेमके कोण माझे राम नाम सत्य करणार होते?’ असे देशमुख म्हणाले. या प्रकरणाची सरकार चौकशी करणार का, एफआयआर दाखल करणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. माझ्या जीवाचे काही बरे-वाईट झाल्यास काय करणार, असा प्रश्न करत सरकारविरोधात आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
गुवाहाटीतील मुक्कामादरम्यान एकनाथ शिंदे आणि आपल्यात झालेल्या चर्चेचाही नितीन देशमुख यांनी खुलासा केला. ‘नितीन, कोणत्याही परिस्थितीत तू थांबत नाही आहेस. मी तुला खूप सहकार्य केले,’ असे शिंदे म्हणाले होते. त्यावर आपण पक्षाचे नेते असल्यामुळे सहकार्य कराल, शोषण थोडेच कराल, असे उत्तर दिल्याचे देशमुख यांनी सांगितले. आपल्यामुळे मिशन फेल होईल, असे शिंदे म्हणाल्याचा दावाही त्यांनी केला.
या चर्चेदरम्यान शिंदे यांनी पिस्तूल आणून स्वतःच्या डोक्यात मारून घेण्याची भाषा केल्याचा दावा देशमुख यांनी केला. त्यावर आपणही स्वतःच्या डोक्यात मारून घेण्याची भाषा केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना रुग्णालयात नेले. दुसऱ्या दिवशी पुन्हा चर्चा झाली, मात्र त्या चर्चेतील तपशील सांगता येणार नसल्याचे नितीन देशमुख यांनी स्पष्ट केले.