नाशिकमधील प्रसिद्ध मिसळ हॉटेल्सना तुकाराम मुंढेंचा दणका; 5 हॉटेल्समध्ये तपासणीत धक्कादायक प्रकार उघड!

    21-Nov-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नाशिक : नाशिककरांच्या आवडीच्या प्रसिद्ध मिसळ आणि खाद्यपदार्थांच्या हॉटेल्सवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. शहरातील पाच नामांकित हॉटेल्सची तपासणी करताना अधिकाऱ्यांना अस्वच्छता, अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन, मुदतबाह्य खाद्यपदार्थ आणि अन्न साठवणुकीतील गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. या कारवाईमुळे नाशिकमधील हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

तुकाराम मुंढे यांच्याकडे असलेल्या अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर तपासणी मोहीम तीव्र केली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील प्रसिद्ध वैशाली आणि रुपाली हॉटेलवर कारवाई झाल्यानंतर आता FDA ने नाशिकमधील खाद्यव्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

नाशिकमधील कोणत्या 5 हॉटेल्सवर कारवाई?
अन्न व औषध प्रशासनाने नाशिकमधील दुर्गा कॅफे, तुषार मिसळ, शामसुंदर, विहार आणि महाराजा काठियावाडी या पाच हॉटेल्सची तपासणी करून नियमभंगाच्या प्रकरणांमध्ये कारवाई केली आहे.

1. हॉटेल विहारमध्ये अस्वच्छता, किटकांचा प्रादुर्भाव

जुना गंगापूर नाका परिसरातील गंगापूर रोडवर असलेल्या प्रसिद्ध हॉटेल विहारची तपासणी करण्यात आली. यावेळी अन्न तयार करण्याच्या ठिकाणी अस्वच्छता आणि किटकांसह इतर उपद्रवी जीवांचा प्रादुर्भाव आढळला. अन्न सुरक्षा आणि मानके नियमांचेही उल्लंघन झाल्याचे तपासणीत निदर्शनास आले.

2. शामसुंदर हॉटेलमध्ये स्वच्छतेचे नियम धाब्यावर
सातपूर एमआयडीसी परिसरातील हॉटेल शामसुंदरवरही FDA ने कारवाई केली. या ठिकाणी स्वच्छतेबाबत गंभीर त्रुटी आढळल्या. तसेच खाद्यपदार्थांची साठवण योग्य पद्धतीने केली जात नसल्याचे आणि अन्नसुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याचे तपासणीत समोर आले.

3. दुर्गा कॅफेचे नोंदणी प्रमाणपत्र निलंबित
कॉलेज रोडवरील दुर्गा कॅफेवर प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या बिलांवर FSSAI परवाना क्रमांक नमूद नसल्याचे आढळले. तसेच मेन्यू कार्ड किंवा डिस्प्ले बोर्डवर स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या तेल अथवा माध्यमाची माहिती दिलेली नव्हती. या त्रुटींमुळे कॅफेचे नोंदणी प्रमाणपत्र निलंबित करण्यात आले आहे.

4. तुषार मिसळमध्ये मुदतबाह्य पदार्थ आढळले

अस्वारी चौकासमोरील प्रसिद्ध तुषार मिसळवरही FDA ने कारवाई केली. तपासणीदरम्यान खाद्यपदार्थांच्या साठवणुकीसाठी अपुरी जागा, मुदतबाह्य अन्नपदार्थ आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळले. त्यामुळे प्रशासनाने संबंधित हॉटेलला दणका दिला आहे.

5. महाराजा काठियावाडीत स्टोअर रूममध्ये उंदरांची विष्ठा
आडगाव फाटा येथील महाराजा काठियावाडी हॉटेलच्या तपासणीतही धक्कादायक बाबी समोर आल्या. स्टोअर रूममध्ये उंदरांची विष्ठा आढळली. तसेच अन्न तयार करण्याच्या ठिकाणी धूळ आणि किटकांचा प्रवेश रोखण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. यानंतर प्रशासनाने कारवाई केली.

हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले; FDA ची मोहीम चर्चेत
पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल्सवरील कारवाईनंतर नाशिकमधील पाच खाद्यआस्थापनांवर झालेल्या कारवाईने हॉटेल व्यवसाय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे. ग्राहकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे, यासाठी अन्न सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

दरम्यान, नाशिकमधील या कारवाईनंतर इतर हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या तपासणीकडेही लक्ष लागले आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर प्रशासन पुढे कोणती कारवाई करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.