
Image Source:(Internet)
मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यानंतर आरोपींच्या पळून जाण्याची आधीपासूनच तयारी करण्यात आली होती. विशेष म्हणजे, आरोपींसाठी नेपाळमध्ये राहण्याची आणि लपण्याची व्यवस्था करण्यात आल्याचा खुलासा तपासादरम्यान झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे मुंबई ते नेपाळ असे कनेक्शन समोर आले आहे.
गोळीबारापूर्वीच नेपाळमध्ये मुक्काम-
पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यापूर्वी त्यांना नेपाळमध्ये नेण्यात आले होते. तेथे त्यांनी तीन ते चार दिवस मुक्काम केला होता. हल्ला पूर्ण झाल्यानंतर पुन्हा नेपाळमध्ये पोहोचण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यानंतर टोळीशी संबंधित इतर व्यक्ती त्यांच्या पुढील राहण्याची व्यवस्था करणार असल्याचे तपासात समोर आले आहे.
आरोपींना भारतीय तपास यंत्रणांच्या हाती लागू न देण्यासाठी आधीपासूनच नियोजन करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.
गोळीबारानंतर राजस्थानच्या कोट्यात आरोपींना अटक-
टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर आरोपी ऋतिक कुमार, फूलसिंग नरेश आणि रेहान अंसारी उर्फ सुक्का हे राजस्थानमधील कोटा येथे पोहोचले होते. तेथून पुढे पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना कोटा पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
या तिघांच्या चौकशीतून हल्ल्याच्या कटासंदर्भात तसेच नेपाळमधील मुक्कामाबाबत महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याचे सांगितले जात आहे.
जुहूमधील फुटबॉल मैदानाबाहेर झाला होता गोळीबार-
मिळालेल्या माहितीनुसार, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील जुहू परिसरातील एका फुटबॉल मैदानाबाहेर ही घटना घडली होती. टायगर श्रॉफ सामना खेळून मैदानाबाहेर येत असताना दोन हल्लेखोरांनी त्याच्या कारवर गोळीबार केला.
या हल्लेखोरांना मदत करण्यासाठी तिसरा साथीदार मोटारसायकलवर उपस्थित असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, टायगरच्या कारवर एकूण पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचा संशय-
या संपूर्ण प्रकरणाचा तपास करताना मुंबई पोलिसांना लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित व्यक्तींचा सहभाग असल्याचे धागेदोरे मिळाल्याची माहिती आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि दाखल करण्यात आलेल्या एफआयआरच्या आधारे पोलिसांनी घटनेची पुनर्रचना केली आहे.
हल्ल्यामागे नेमका कोणाचा हात होता, आरोपींना सूचना कोणी दिल्या आणि या कटात आणखी किती जण सहभागी आहेत, याचा तपास सध्या सुरू आहे.
हल्ल्यामागील सूत्रधार कोण? तपासातून आणखी खुलासे होणार?
टायगर श्रॉफवरील गोळीबार हा केवळ अचानक घडलेला हल्ला नसून त्यामागे पूर्वनियोजित कट असल्याचा संशय तपास यंत्रणांकडून व्यक्त केला जात आहे. नेपाळमधील मुक्काम, हल्ल्यानंतरचे पलायन आणि आरोपींना मिळालेली मदत या सर्व बाबी तपासाच्या केंद्रस्थानी आहेत.
आता या हल्ल्याचा सूत्रधार कोण, गोळीबार करण्याचे आदेश कुणी दिले आणि या संपूर्ण कटामागे आणखी कोणत्या व्यक्तींचा सहभाग आहे, याबाबत मुंबई गुन्हे शाखेच्या पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.