
Image Source:(Internet)
नवी दिल्ली: कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) सहसंयोजक सौरभ दास यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवरून :राजकीय टीका केली आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना आणि त्यांच्या सरकारांना लक्ष्य करण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘हिशोब चुकता करण्याचा दिवस जवळ येत आहे,’ असे म्हणत त्यांनी केंद्रातील सत्ताधाऱ्यांना इशारा दिला.
पंजाबमधील वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर सौरभ दास यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर आपली भूमिका मांडली. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून कारवाया केल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी म्हटले. निवडणूक आयोगावर टीका करत, सत्तेचा गैरवापर तरुण पिढी स्वीकारणार नाही, असा दावा त्यांनी केला.
बेरोजगारी, परीक्षांमधील कथित अनियमितता, शिक्षण व्यवस्था, प्रदूषण आणि भ्रष्टाचार या मुद्द्यांवरूनही दास यांनी यापूर्वी सरकारला घेरले आहे. आगामी निवडणुकांमध्ये तरुण मतदार सत्ताधाऱ्यांना धडा शिकवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे सीजेपी सरकारविरोधात आंदोलनाची भूमिका घेणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.