
Image Source:(Internet)
नागपूर : शहरातील वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका कमी करण्यासाठी नागपूर वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध लागू केले आहेत. शहरातील 53 प्रमुख मार्गांवर सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत ट्रक आणि अन्य अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. 21 नोव्हेंबर 2026 पासून लागू करण्यात आलेली ही अधिसूचना पुढील आदेशापर्यंत कायम राहणार आहे.
शहरातील वाढती वाहनसंख्या आणि अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे प्रमुख चौक, बाजारपेठा, शाळा, रुग्णालये तसेच निवासी परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. यासोबतच अपघातांचा धोका लक्षात घेऊन वाहतूक विभागाने हा निर्णय घेतला आहे. एमआयडीसी, सोनेगाव, सीताबर्डी, सदर, अजनी, कॉटन मार्केट, लकडगंज, सक्करदरा, इंदोरा, कळमना, पारडी आणि कामठी वाहतूक परिमंडळांतर्गत येणाऱ्या 53 प्रमुख मार्गांवर अवजड वाहनांना निर्धारित वेळेत प्रवेश करता येणार नाही.
सकाळी 6 ते रात्री 10 या प्रतिबंधित वेळेत अत्यावश्यक कारणासाठी अवजड वाहनांना संबंधित मार्गावर प्रवेश करायचा असल्यास पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहणार आहे. वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनचालकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.