नागपुरात ड्रग्स तस्करीचा पर्दाफाश; आसीनगरातून 16 ग्रॅम MD जप्त, युवक अटकेत

    21-Nov-2026
Total Views |
पाचपावली पोलिसांची मध्यरात्री कारवाई; ड्रग्स पुरवणाऱ्या ‘माया भाई’चा शोध सुरू

Image Source:(Internet)

नागपुरातील अमली पदार्थांच्या व्यवहारांवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कारवाईचा धडाका सुरू असतानाच पाचपावली पोलिसांनी आसीनगर परिसरात छापा टाकून MD ड्रग्ससह एका युवकाला अटक केली. सलीम स्पोर्ट्स ग्राउंड परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत 16 ग्रॅम MD पावडर जप्त करण्यात आली. साहिल अहमद फहीम उद्दीन मलिक (24) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.

पाचपावली पोलिसांना आसीनगर परिसरात ड्रग्सची हालचाल सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर डीबी पथकाने मध्यरात्री संबंधित ठिकाणी धाड टाकली. पंचांसमक्ष आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडून MD ड्रग्स मिळून आले. पोलिसांनी ड्रग्स, मोबाईल आणि रोख रकमेसह एक लाख रुपयांहून अधिकचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणातील ड्रग्स पुरवठ्याचा स्रोत शोधताना पोलिसांनी सोहेल मलिक उर्फ ​​‘माया भाई’, रा. टेकावस्ती, याच्यावरही लक्ष केंद्रित केले असून त्याचा शोध सुरू आहे. पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास हाती घेतला आहे.