विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा सायबर ठगांकडून वापर; पुण्यातील महिलेला डिजिटल अरेस्टची भीती दाखवून ३ लाखांची फसवणूक

    20-Nov-2026
Total Views |
 
Vishwas Nangare Patil
 Image Source:(Internet)
 
पुणे : सायबर गुन्हेगारांनी आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर करून नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील Vishwas Nangare Patil यांच्या नावाचा आधार घेत सायबर ठगांनी पुण्यातील एका महिला डॉक्टरची तब्बल ३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डिजिटल अरेस्टची धमकी देत तसेच गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची भीती दाखवत आरोपींनी डॉक्टरला आर्थिक गंडा घातला.
 
२२ ते २७ ऑक्टोबरदरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी ४३ वर्षीय महिला डॉक्टरने पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. सुरुवातीला सायबर पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा पुढील तपासासाठी सिंहगड रोड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
 
पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने विश्वास संपादन-
महिला डॉक्टरला अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव चौधरी असल्याचे सांगितले. आपण 'सायबर सेल ऑफ इंडिया'मधून बोलत असून वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे सहाय्यक म्हणून कार्यरत असल्याचा बनाव त्याने केला.
 
त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरून आणखी एका व्यक्तीने संपर्क साधला. त्याने स्वतःची ओळख मुंबई क्राईम ब्रँचमधील वरिष्ठ अधिकारी अशी करून दिली. या दोघांनी मिळून महिला डॉक्टरवर दबाव निर्माण केला आणि विविध गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी दिली.
 
आधार कार्डच्या गैरवापराचा खोटा आरोप-
आरोपींनी डॉक्टरच्या आधार कार्डचा वापर करून एका संशयास्पद मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्यात आल्याचे सांगितले. तसेच तिच्या नावाने अश्लील संदेश आणि जाहिराती पाठवल्या जात असून त्याद्वारे आर्थिक व्यवहार सुरू असल्याचा आरोप केला.
 
एवढेच नव्हे, तर मनी लाँड्रिंग आणि दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक मदत केल्याच्या प्रकरणातही डॉक्टरचे नाव जोडण्यात आले. या गुन्ह्यांमुळे अटक होऊ शकते, असे सांगून आरोपींनी तिला प्रचंड मानसिक दबावाखाली आणले.
 
अटकेपासून वाचायचे असेल तर सांगितलेल्या बँक खात्यात पैसे जमा करावे लागतील, असे आरोपींनी बजावले. कारवाईच्या भीतीने महिला डॉक्टरने त्यांच्या सूचनेनुसार ३ लाख रुपये पाठवले. पैसे पाठवल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले आणि तिने पोलिसांकडे धाव घेतली.
 
यापूर्वीही नांगरे पाटील यांच्या नावाने १ कोटी ४ लाखांची लूट-
विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा वापर करून फसवणूक होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या छायाचित्रासह कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून तयार केलेल्या आवाजाचा वापर करून एका व्यक्तीला व्हिडीओ कॉल केला होता.
 
या कॉलदरम्यान डिजिटल अरेस्टची भीती दाखवून संबंधित व्यक्तीकडून तब्बल १ कोटी ४ लाख रुपये उकळण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी कानपूर आणि इंदूर येथे कारवाई करून दोन आरोपींना अटक केली होती.
 
कोण आहेत विश्वास नांगरे पाटील?
विश्वास नांगरे पाटील हे १९९७ च्या बॅचचे महाराष्ट्र केडरमधील वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते नागपूर शहराचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी त्यांनी बजावलेल्या धाडसी कामगिरीमुळे त्यांचे नाव देशभर चर्चेत आले होते.
 
पुणे ग्रामीण, ठाणे ग्रामीण, नाशिक शहर आणि कोल्हापूर परिक्षेत्र अशा विविध ठिकाणी त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. पोलीस सेवेसोबतच युवकांना मार्गदर्शन करणारे प्रेरणादायी वक्ते म्हणूनही त्यांची ओळख आहे. 'मन में है विश्वास' आणि 'कर हर मैदान फतेह' ही त्यांची पुस्तकेही लोकप्रिय आहेत.
 
डिजिटल अरेस्टच्या धमकीला बळी पडू नका-
पोलीस अधिकारी किंवा तपास यंत्रणांचे नाव सांगून फोन करणे, गंभीर गुन्ह्यांचा आरोप करणे, अटकेची भीती दाखवणे आणि पैसे विशिष्ट खात्यात जमा करण्यास सांगणे, ही सायबर ठगांची फसवणुकीची पद्धत आहे. प्रत्यक्षात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली अशा प्रकारे कोणालाही पैसे भरण्यास भाग पाडण्याचा अधिकार तपास यंत्रणांना नाही.
 
नागरिकांनी अशा धमकीच्या फोनला घाबरून अनोळखी बँक खात्यांमध्ये पैसे पाठवू नयेत. फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा cybercrime.gov.in या अधिकृत पोर्टलवर तक्रार दाखल करावी.