Image Source:(Internet)
नागपूर : नागपूर रिंगरोड Nagpur Ring Road प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आणि समस्यांबाबत राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या असून, सर्व मुद्द्यांचा विचार करून सरकारकडून लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे महसूलमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
शुक्रवारी (२० नोव्हेंबर) नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. रिंगरोड हा शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प असला, तरी त्यासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करणेही तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मांडलेल्या मागण्यांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. या चर्चेच्या आधारे लवकरच निर्णय घेतला जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.
दीक्षाभूमीमुळेच नागपूरला जागतिक ओळख-
दीक्षाभूमीच्या नामांतराबाबत खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. दीक्षाभूमीचे महत्त्व जगभरात पोहोचले असून, नागपुरात येणारा प्रत्येक पर्यटक आणि नागरिक दीक्षाभूमीला भेट देतो. दीक्षाभूमीमुळेच नागपूरची आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे इतरांच्या वक्तव्यांपेक्षा दीक्षाभूमीचे ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
भटक्या समाजासाठी जानेवारीत विशेष शिबिरे-
राज्यातील भटक्या समाजातील नागरिकांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळावा, यासाठी महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. येत्या ७ आणि ८ जानेवारी रोजी विशेष शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. या शिबिरांमध्ये जन्मदाखले, घरासंबंधी कागदपत्रे, विविध शासकीय प्रमाणपत्रे तसेच कल्याणकारी योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
याशिवाय फासेपारधी समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र उपाययोजनांवरही चर्चा झाली आहे. समाजासाठी गावठाणांची निर्मिती, तांड्यांना ग्रामपंचायतीचे अधिकार, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधा आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत विचारविनिमय झाल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
सातारा बँक प्रकरणाचा महायुतीवर परिणाम नाही-
सातारा बँकेशी संबंधित प्रकरणावर बोलताना बावनकुळे यांनी हा विषय स्थानिक राजकारणापुरता मर्यादित असल्याचे सांगितले. जिल्हा पातळीवर राजकीय मतभेद असणे स्वाभाविक आहे. मात्र, या प्रकरणाचा महायुतीच्या एकजुटीवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे या प्रकरणाचा महायुतीशी संबंध जोडणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधींवर बावनकुळेंची टीका-
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सोशल मीडिया पोस्टवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी त्यांच्यावर टीका केली. राहुल गांधी हे सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची संधी शोधत असतात. कोणताही मुद्दा समोर आला की त्यावरून पंतप्रधानांना लक्ष्य केले जाते. राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाची स्वप्ने पडत असून ते 'स्वप्नांचे सौदागर' असल्याची टीका बावनकुळे यांनी केली.