नागपूरच्या सीताबर्डीत एसटी बसचा भीषण अपघात; ६० वर्षीय महिलेचा चाकाखाली येऊन मृत्यू

    18-Nov-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : शहरातील सीताबर्डी परिसरात एसटी बसच्या धडकेत ६० वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी घडली. इटरनिटी मॉलसमोर रस्ता ओलांडत असताना भरधाव एसटी बसने महिलेला जोरदार धडक दिली. धडकेनंतर महिला बसच्या चाकाखाली आल्याने काही अंतरापर्यंत फरफटत गेली. या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

मृत महिलेचे नाव पुष्पा कृष्णराव दहीवाडे (६०, रा. कान्हाळा, ता. कारंजा, जि. वर्धा) असे आहे. नातेवाइकासाठी औषधे घेण्याकरिता त्या नागपुरात आल्या होत्या. बुधवारी सकाळी सुमारे ११ वाजता सीताबर्डीतील शंकर भोजनालयाजवळ बसमधून उतरून त्या रस्ता ओलांडत होत्या. याचवेळी चंद्रपूरहून नागपूरकडे येणाऱ्या एसटी बसने त्यांना धडक दिली. घटनेची माहिती मिळताच सीताबर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी बसचालक दीपक विश्वनाथ इंगळे (५२, रा. अमरावती) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सीताबर्डी पोलीस करीत आहेत.