
Image Source:(Internet)
उमरेड-नागपूर महामार्गावर सोमवारी सायंकाळी धावत्या ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतल्याने मोठी खळबळ उडाली. चांपा शिवारातील इंडियन ऑइल पेट्रोलपंपासमोर सायंकाळी सुमारे ५.२० वाजता ही घटना घडली. आग लागल्यानंतर काही क्षणांतच ट्रॅव्हल्समध्ये आगीच्या ज्वाळा पसरल्या. मात्र, प्रसंगावधान राखत प्रवाशांनी तातडीने बसमधून बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-१२/केडब्ल्यू-१८९० क्रमांकाची ही खासगी ट्रॅव्हल्स नागपूरहून उमरेडच्या दिशेने जात होती. प्रवास सुरू असतानाच चांपा शिवारातील पेट्रोलपंपाजवळ बसमध्ये अचानक आग लागली. आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत सुरुवातीला शॉर्ट सर्किटचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ट्रॅव्हल्सला आग लागल्याचे लक्षात येताच बसमधील महिला, पुरुष आणि लहान मुलांमध्ये घबराट निर्माण झाली. प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी तातडीने बसमधून बाहेर धाव घेतली. त्यामुळे सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका झाली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. संपूर्ण ट्रॅव्हल्स आगीच्या ज्वाळांनी वेढली गेली आणि काही वेळातच बस जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच उमरेड येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ करत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत ट्रॅव्हल्सचे मोठे नुकसान झाले होते. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली असून, या घटनेची नोंद करण्यात आली आहे. आग लागण्याचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
या घटनेमुळे उमरेड-नागपूर महामार्गावर काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. सुदैवाने वेळीच प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.