धोनीने घेतला मोठा निर्णय! IPL मध्ये आता खेळाडू नाही, मेंटर म्हणून दिसणार

    17-Nov-2026
Total Views |
Image Source:(Internet)

भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) दिग्गज खेळाडू एमएस धोनीने अखेर IPL मधील आपल्या खेळाडूच्या कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. 2027 च्या IPL हंगामापासून धोनी मैदानावर खेळाडू म्हणून नाही, तर CSK च्या मेंटरच्या भूमिकेत संघाला मार्गदर्शन करताना दिसणार आहे.

CSK चे मालक एन. श्रीनिवासन यांनी धोनीच्या नव्या भूमिकेची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, धोनी हा CSK च्या ओळखीचा कायमस्वरूपी भाग आहे आणि CSK हे त्याचेच घर आहे.

IPL 2027 साठी खेळाडूंच्या रिटेन्शनची अंतिम मुदत संपण्याच्या काही तास आधी ही मोठी घोषणा करण्यात आली. त्यामुळे धोनीच्या IPL भवितव्याबाबत सुरू असलेल्या चर्चांनाही पूर्णविराम मिळाला आहे.

धोनी आता CSK च्या नव्या टीम मॅनेजमेंटसोबत काम करणार आहे. संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी आता झहीर खानकडे देण्यात आली आहे. यापूर्वी स्टीफन फ्लेमिंग हे संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. धोनी आणि फ्लेमिंग यांच्या नेतृत्वाखाली CSK ने IPL मध्ये तब्बल पाच वेळा विजेतेपद मिळवले.

धोनीने 2008 पासून CSK सोबतचा प्रवास सुरू केला. सुरुवातीपासूनच तो संघाचा महत्त्वाचा भाग राहिला. त्याच्या नेतृत्वाखाली CSK ने अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये यश मिळवले. IPL व्यतिरिक्त संघाने दोन वेळा चॅम्पियन्स लीग T20 चे विजेतेपदही मिळवले.

धोनीने आपल्या IPL कारकिर्दीत एकूण 278 सामने खेळले. त्याने 5,439 धावा केल्या. त्याच्या नावावर 24 अर्धशतके आणि 264 षटकार आहेत. 2026 च्या IPL हंगामात तो CSK च्या संघात असला तरी एकही सामना खेळला नव्हता.
धोनीचा शेवटचा IPL सामना 2025 मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध अहमदाबाद येथे झाला होता. या सामन्यात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती.

CSKच्या व्यवस्थापनाने धोनीच्या खेळाडू म्हणून केलेल्या योगदानाचे कौतुक केले आहे. धोनीने केवळ संघाला ट्रॉफी मिळवून दिल्या नाहीत, तर CSK आणि चेन्नई शहराशीही त्याचे खास नाते निर्माण झाले, असे संघ व्यवस्थापनाने म्हटले आहे.

आता धोनी युवा खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहे. संघात अनेक युवा क्रिकेटपटू असल्याने त्याचा अनुभव आणि क्रिकेटचे ज्ञान त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे मैदानावर धोनीची फलंदाजी आणि नेतृत्व दिसणार नसले तरी मेंटर म्हणून त्याचा CSK सोबतचा प्रवास पुढेही सुरू राहणार आहे.