शिक्षण विभागाचा मोठा निर्णय! CET परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना दोन संधी

    17-Nov-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता 11 अभ्यासक्रमांसाठी CET परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची दुसरी संधी मिळणार आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) शैक्षणिक वर्ष 2027-28 साठी CET परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार पहिल्या फेरीतील परीक्षा 28 जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

सुरुवातीला MBA, MMS, PGDM आणि PGCM या अभ्यासक्रमांसाठी CET परीक्षा घेतली जाणार आहे. यानंतर इतर अभ्यासक्रमांच्या परीक्षा होणार आहेत.

यंदा MBA, इंजिनिअरिंग, फार्मसी आणि कृषी यासोबतच आणखी काही अभ्यासक्रमांसाठीही दोन वेळा CET घेण्यात येणार आहे. यामध्ये PGDM, PGCM, पाच वर्षांचा LLB, BHMCT, BCA, BBA, BMS आणि BBM या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

गेल्या वर्षी केवळ PCM, PCB आणि MBA/MMS या तीन अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा CET घेण्यात आली होती. या निर्णयाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे यंदा आणखी आठ अभ्यासक्रमांचा यात समावेश करण्यात आला आहे.

JEE Main परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाते. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाही CET मध्ये दोन संधी मिळाव्यात, असा यामागचा उद्देश आहे.

पहिल्या परीक्षेत कमी गुण मिळाले किंवा अपेक्षित निकाल मिळाला नाही, तर विद्यार्थ्यांना दुसऱ्या परीक्षेत पुन्हा प्रयत्न करता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपले गुण वाढवण्याची संधी मिळेल.

यंदा राज्यात एकूण 21 CET परीक्षा घेतल्या जाणार आहेत. CET Cell कडून अंतिम वेळापत्रक आणि अर्जाच्या तारखा लवकरच स्पष्ट केल्या जाणार आहेत.