
Image Source:(Internet)
मुंबईतील बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ या निवासस्थानाबाहेर गोळीबार करण्याचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने या प्रकरणात दोघांना अटक केली आहे. एकाला ठाण्यातून, तर दुसऱ्याला दिल्लीमधून ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दिपक सिंह उर्फ दीप याला ठाण्यातून तर विकास ठाकूर उर्फ विकी याला दिल्लीमधून अटक करण्यात आली. अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गोळीबार करण्याची जबाबदारी दिपक सिंह याच्यावर देण्यात आली होती, असा पोलिसांना संशय आहे.
या कटामागे नेमका कोण आहे, आरोपींचे इतर कोणाशी संबंध आहेत आणि गोळीबारासाठी शस्त्रे कशी उपलब्ध होणार होती, याचा तपास दिल्ली पोलिसांकडून सुरू आहे.
अमिताभ बच्चन यांच्या 1984 मधील शीखविरोधी दंगलीशी संबंधित कथित वक्तव्यामुळे त्यांना लक्ष्य करण्याचा कट रचण्यात आला असावा, असा संशयही पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. मात्र, या कटामागील नेमके कारण आणि सूत्रधार कोण आहे, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
पोलिसांच्या कारवाईमुळे मुंबई आणि दिल्लीमध्ये घडू शकणाऱ्या दोन मोठ्या घटनांना आळा बसल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीमध्ये एका व्यावसायिकावर गोळीबार करण्याचा कट होता, तर दुसरीकडे मुंबईत अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर फायरिंगची तयारी करण्यात आल्याचा संशय आहे.
या प्रकरणामुळे बॉलिवूडमधील कलाकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. याआधी अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबाराच्या घटनेनंतर अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्यावरही काही संशयितांची नजर असल्याची माहिती समोर आली होती.
गँगस्टर आणि गुन्हेगारी टोळ्यांकडून सेलिब्रिटींना धमक्या मिळण्याच्या घटनांमुळे बॉलिवूडमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अनेक कलाकारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’बाहेर गोळीबाराचा कट नेमका कशासाठी रचला होता आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.