
Image Source:(Internet)
नागपूर : आर्थिक अडचणींचा फायदा घेत महिलांना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारात ढकलणाऱ्या एका दलालाला नागपूर पोलिसांनी रंगेहात पकडले. वर्धा येथील २३ वर्षीय तरुणीला देहव्यापारासाठी ग्राहकाच्या हवाली करण्याचा प्रयत्न सुरू होता. यासाठी आरोपीने बनावट ग्राहकासोबत अवघ्या दोन हजार रुपयांत सौदा ठरवला होता. छत्रपती चौकातील वर्धा रोडवर नीरज डेकोरसमोर सामाजिक सुरक्षा विभाग आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने (AHTU) संयुक्त कारवाई करत आरोपीला अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव तुषार फुलकारी (वय ३२, रा. आर्वी नाका, वर्धा) असे आहे. आरोपी वर्धा येथे देहव्यापाराचे जाळे चालवत असल्याची माहिती असून, पोलिसांची चाहूल लागल्यानंतर तो तरुणीला घेऊन नागपुरात आला होता. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच दोन पंच आणि बनावट ग्राहकाच्या मदतीने सापळा रचण्यात आला. आरोपीने तरुणीला ग्राहकासमोर आणताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तपासात आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या महिला आणि तरुणींना अधिक पैसे कमावण्याचे आमिष दाखवून या व्यवसायात ढकलले जात असल्याचे समोर आले आहे. आरोपीकडून मोबाइल आणि दोन हजार रुपये रोख रकमेसह एकूण १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, तरुणीची सुटका करण्यात आली आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.