
Image Source:(Internet)
पुणे : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा केली. या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे सांगत, येत्या काही दिवसांत विद्यार्थ्यांच्या नोकरी आणि भरती प्रक्रियेबाबत चांगली बातमी मिळण्याची अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
पुण्यातील एस.एम. जोशी पुलावर एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनस्थळ सोडणार नसल्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, पोलिसांनी आंदोलनस्थळ मोकळे करण्याचे आवाहन केले होते.
राज ठाकरे यांनी ५ ऑक्टोबर रोजी आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि त्यांच्या अपेक्षा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. नोकरीसाठी घर, कुटुंब आणि स्वतःचा जिल्हा सोडून संघर्ष करणाऱ्या तरुणांची परिस्थिती वेदनादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेची माहिती देताना राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना संयम राखण्याचे आवाहन केले. भरती प्रक्रियेबाबत वस्तुस्थिती समजून घेणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी यापूर्वी व्यक्त केले होते.
आता राज ठाकरे यांच्या चर्चेनंतर सरकारकडून सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा विद्यार्थ्यांना आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सरकारकडून अधिकृत निर्णय जाहीर झालेला नसल्याने पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.