
Image Source:(Internet)
कोल्हापूर : महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीच्या वास्तव्यावरून सुरू असलेल्या वादात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. माधुरीला पुन्हा गुजरातमधील वनतारा प्रकल्पात पाठवण्याची मागणी करणारी पेटा इंडियाची पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळली. तसेच पेटाला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावून ही रक्कम माधुरीच्या वैद्यकीय उपचारांसाठी खर्च करण्याचे निर्देश दिले आहेत.
वनतारा प्रकल्पात सुमारे १३ महिने राहिल्यानंतर माधुरी हत्तीण हाय पॉवर कमिटीच्या मान्यतेने नांदणी मठात परतली होती. मात्र, तिच्या देखभालीबाबत प्रश्न उपस्थित करत पेटा इंडियाने पुन्हा न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने ती फेटाळून लावली.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे माधुरी हत्तीणीचा नांदणी मठातील मुक्काम कायम राहणार आहे. या निर्णयाचे माजी खासदार राजू शेट्टी आणि नांदणी मठाचे प्रमुख स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक महास्वामीजी यांनी स्वागत केले. माधुरीच्या वास्तव्यावरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत या निर्णयाला महत्त्व प्राप्त झाले आहे.