‘राज ठाकरे उत्तम व्यंगचित्रकार, उद्धव ठाकरे छायाचित्रकार; मला मात्र राजकारण करू द्या’; फडणवीसांची कोपरखळी

    29-Oct-2026
Total Views |
 
CM Fadnavis
 Image Source:(Internet)
 
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Fadnavis आणि ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले. ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. या कार्यक्रमात फडणवीस यांनी आपल्या खास शैलीत ठाकरे बंधूंना मिश्किल टोला लगावला.
 
“राजजी उत्तम व्यंगचित्रकार आहेत, तर उद्धवजी उत्तम छायाचित्रकार आहेत. त्यांनी आपापली कला जोपासावी. मला राजकारण चांगले येते, त्यामुळे मला राजकारण करू द्या,” असे म्हणत फडणवीस यांनी दोन्ही नेत्यांना कोपरखळी मारली. त्यांच्या या विधानामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला.
 
कलेच्या निमित्ताने तिन्ही नेते एकत्र आल्याबाबत बोलताना फडणवीस यांनी, अशा कार्यक्रमांसाठी एकाच मंचावर येण्यात त्यांना काहीही विशेष वाटत नसल्याचे स्पष्ट केले. कलेला राजकीय मतभेदांच्या पलीकडे नेण्याची ताकद असल्याचेही त्यांच्या वक्तव्यातून अधोरेखित झाले.
 
व्यंगचित्र हे केवळ रेखाटन नसून प्रभावी अभिव्यक्तीचे माध्यम आहे, असे सांगताना त्यांनी व्यंगचित्र आणि अग्रलेख यांच्या प्रभावाची तुलना केली. एखाद्या अग्रलेखातून जे व्यक्त होते, तेच व्यंगचित्रातूनही शब्दांशिवाय मांडता येते, असे ते म्हणाले. राजकीय नेते हे अनेकदा व्यंगचित्रांचे विषय ठरतात, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.
 
यावेळी फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्याशी संबंधित एक गंमतीशीर किस्सा सांगितला. आपले व्यंगचित्र काढताना नाक आणि कान मोठे दाखवावेत, मात्र पोट लहान दाखवावे, अशी विनंती आपण राज ठाकरे यांना केली होती, असे त्यांनी सांगितले. मात्र, अद्याप आपली ही इच्छा पूर्ण झालेली नसल्याचेही त्यांनी विनोदी शैलीत नमूद केले.
दरम्यान, कार्यक्रमापूर्वी फडणवीस आणि ठाकरे बंधू यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याचे वृत्त आहे. या चर्चेचा तपशील समोर आलेला नसला, तरी तिन्ही नेत्यांच्या एकत्र उपस्थितीची आणि फडणवीस यांच्या विधानांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.