
Image Source:(Internet)
मुंबई : सकाळी उठल्यापासून दिवसातून अनेकदा चहाचा आस्वाद घेणाऱ्यांसाठी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दुधाच्या पुरवठा प्रक्रियेबाबत महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. आपण चहामध्ये वापरत असलेले दूध ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी कोणत्या प्रक्रियेतून जाते, त्याची वाहतूक कशी होते आणि ते योग्य तापमानात साठवले जाते का, याची माहिती असणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
राज्यात अन्नभेसळीविरोधात कारवाईचा धडाका सुरू असतानाच मुंढे यांनी दैनंदिन जीवनातील चहाच्या सवयीवरही लक्ष वेधले आहे. अनेकांसाठी चहा हा केवळ पेय नसून दिवसाची सुरुवात करण्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. मात्र, चहा तयार करताना वापरले जाणारे दूध आणि साखरेचे प्रमाण याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते.
पाकिटातील दूध थेट ग्राहकांच्या हातात येत नाही. दूध संकलित केल्यानंतर त्याची टँकर किंवा कॅनमधून वाहतूक केली जाते. त्यानंतर ते दुकानांपर्यंत पोहोचवून साठवले जाते. या संपूर्ण प्रक्रियेत दुधाची योग्य हाताळणी आणि तापमान राखणे महत्त्वाचे ठरते. दूध साधारण चार अंश सेल्सिअस तापमानात ठेवण्याच्या प्रक्रियेचाही मुंढे यांनी उल्लेख केला.
त्यामुळे रोज चहा पिताना त्यात वापरल्या जाणाऱ्या दुधाचा स्रोत आणि ते ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंतची प्रक्रिया समजून घेणे गरजेचे आहे. अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत जागरूक राहण्याचा संदेश त्यांच्या विधानातून मिळतो.