नागपूरच्या हसनबागमध्ये मध्यरात्री कारमधून फायरिंग; वणीहून आरोपी जेरबंद

    02-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूरच्या नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हसनबाग चौकात मध्यरात्री कारमधून हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणातील आरोपी रोशन अशोक मोहिते उर्फ गोट्या याला क्राईम ब्रँच युनिट-४च्या पथकाने वणी येथून अटक केली आहे. आरोपीकडून घटनेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी त्याला नंदनवन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

बुधवारी रात्री सुमारे दीड वाजता हसनबाग परिसरातील रहिवासी आबिद खान मोहम्मद खान हे दुचाकीने घरी जात होते. डीएल मोटर्सजवळ फ्लायओव्हरखाली ते वळत असताना समोरून आलेल्या कारमधील व्यक्तीने खिडकीतून पिस्तूल बाहेर काढले आणि हवेत गोळी झाडल्याचे तक्रारीत नमूद आहे. फायरिंगनंतर कार वेगाने घटनास्थळावरून निघून गेली.

गोळीबाराच्या आवाजाने परिसरात काही काळ खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. घटनास्थळावरील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना कारची माहिती मिळाली. ही कार रोशन मोहितेच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याचा शोध सुरू करण्यात आला.

क्राईम ब्रँच युनिट-४च्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे वणी येथे कारवाई करत रोशन मोहितेला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत हसनबाग परिसरातील सिराज नावाच्या व्यक्तीसोबत दोन महिन्यांपूर्वी झालेल्या वादाचा संदर्भ समोर आला आहे. सिराजचा शोध घेत रोशन परिसरात आला होता, मात्र तो न भेटल्याने त्याने हवेत गोळीबार केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

दरम्यान, फायरिंगसाठी वापरलेले पिस्तूल, आरोपीसोबत असलेले इतर साथीदार आणि गोळीबारामागील नेमके कारण याचा नंदनवन पोलीस तपास करत आहेत.