उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का; आनंद दुबे यांचा शिवसेना ठाकरे गटाला रामराम

    13-Oct-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि हिंदी भाषिक चेहरा आनंद दुबे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह राष्ट्रीय प्रवक्तेपदाचाही राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला असून, ते आता कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आनंद दुबे हे ठाकरे गटाची भूमिका आक्रमकपणे मांडणाऱ्या नेत्यांपैकी एक मानले जात होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पक्षाची भूमिका आणि त्यांच्या वैचारिक भूमिकेत मतभेद निर्माण झाल्याची चर्चा होती. हिंदुत्व, सनातन धर्म आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत त्यांनी अनेकदा उघडपणे समर्थनाची भूमिका मांडली होती. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर आपली श्रद्धा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

पक्षाच्या भूमिकेबाबत निर्माण झालेली अस्वस्थता आणि वैचारिक मतभेद हे त्यांच्या राजीनाम्यामागील कारण असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या बाहेर पडण्यामुळे ठाकरे गटाला हिंदी भाषिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या चेहऱ्याला मुकावे लागणार आहे.

दरम्यान, आनंद दुबे यांचा पुढील राजकीय निर्णय अद्याप स्पष्ट झालेला नाही. ते भाजपमध्ये प्रवेश करणार की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पाठिंबा देणार, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, कोणत्याही नव्या पक्षात प्रवेश करण्याची अधिकृत घोषणा त्यांनी केलेली नसल्याने त्यांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष लागले आहे.