‘हा ठाकरेंचा शब्द, फसवी मोदी गॅरंटी नव्हे’; नाशिकमधून उद्धव ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

09 Jan 2026 22:24:02
 
Uddhav Thackeray
Image Source:(Internet) 
नाशिक :
आगामी नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांची संयुक्त प्रचारसभा नाशिकमध्ये पार पडली. या सभेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Thackeray) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उठवली.
 
सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “नाशिककरांनी एकदा शिवसेना-मनसेच्या हातात सत्ता देऊन पाहावी. आम्ही शहराचा संपूर्ण कायापालट करून दाखवू. हा आमचा शब्द आहे. ही कुठलीही फसवी मोदी गॅरंटी नाही.” अशा शब्दांत त्यांनी भाजपवर थेट निशाणा साधला.
 
आपल्या भाषणाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी या सभेचे विशेष महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, “गेल्या दोन वर्षांत नाशिकमधील ही चौथी सभा आहे. आज माझ्यासोबत माझा भाऊ राज ठाकरे, संजय राऊत आणि उद्याचे नगरसेवक
 
व्यासपीठावर आहेत. नाशिकची जनता मोठ्या अपेक्षेने आमच्याकडे पाहत आहे.” राज ठाकरे यांनी नाशिक आणि मुंबईत मनसे व शिवसेनेच्या काळात झालेल्या विकासकामांचा उल्लेख केल्याचेही त्यांनी सांगितले.
 
“काम करणारे दोन भाऊ एकत्र आले, तर नाशिक किती वेगाने पुढे जाईल, याचा विचार नागरिकांनी करावा,” असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
 
राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “आज पश्चिम बंगालमध्ये हुकूमशाहीविरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे. मग आपण गप्प बसायचं का? हा वचननामा नाही, रंगीत कागद नाही, हा ठाकरेंचा शब्द आहे. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. इतरांप्रमाणे श्रेय लाटण्याचं राजकारण आम्ही करत नाही.”
 
यावेळी त्यांनी भाजपवर घराणेशाहीचा आरोप फेटाळून लावताना, “घराणेशाहीचा आरोप करणारे स्वतःच एकाच घरात अनेक उमेदवारी देतात,” अशी टीका केली. विधानसभा अध्यक्ष, निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवरही त्यांनी सवाल उपस्थित करत, “आज देशात लोकशाही नाही, तर झुंडशाही सुरू आहे,” असे परखड मत मांडले.
 
पर्यावरणाच्या मुद्द्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी तपोवन आणि ताडोबा येथील प्रकल्पांवरून सरकारवर गंभीर आरोप केले. “हिंदुत्वाचा बुरखा नसता तर अशी कामं झाली नसती,” असा आरोप त्यांनी केला.
 
भाषणाच्या शेवटी उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईत आम्ही विकास करून दाखवला आहे. नाशिकची सत्ता आमच्या हाती द्या. येथे सीबीएससी शाळा, वैद्यकीय महाविद्यालये उभारू. स्वस्त आणि दर्जेदार सार्वजनिक वाहतूक देणारी व्यवस्था उभी करू. बेस्टसारखी सुविधा नाशिकमध्ये देण्याची ताकद आमच्यात आहे.
Powered By Sangraha 9.0