आम्ही मुंबईत म्हातारे झालो म्हणूनच मुंबई महाराष्ट्रात टिकली; फडणवीसांच्या वक्तव्यावर राऊतांचा पलटवार

09 Jan 2026 15:11:08

Sanjay Raut
Image Source:(Internet) 
मुंबई :
नागपूरमध्ये आयोजित ‘तऱ्री पोहे विथ देवा भाऊ’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Fadnavis) यांनी स्वतःला ‘सर्टिफाईड नागपूरकर’ म्हणत मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झालेल्या नेत्यांवर विकास न केल्याची टीका केली होती. या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना थेट प्रत्युत्तर दिलं आहे.
 
संजय राऊत म्हणाले, “आम्ही मुंबईत जन्मलो आणि संघर्ष करत म्हातारे झालो म्हणूनच आज मुंबई महाराष्ट्रात सुरक्षित आहे. मुंबई लढवून मिळवलेली आहे, सहज मिळालेली नाही.” त्यांनी फडणवीसांच्या वक्तव्यावर जोरदार टीका करत, “जमिनीतून आपोआप बटाटे उगवावेत तसे यश आम्हाला मिळालेले नाही. आम्ही रस्त्यावर उतरून, संघर्ष करून मुंबईसाठी लढलो आहोत,” असा टोला लगावला.
 
राऊत पुढे म्हणाले, “आम्ही जेव्हा मुंबईच्या अस्मितेसाठी लढत होतो, तेव्हा देवेंद्र फडणवीसांचा जन्मही झाला नव्हता. मुंबईचा इतिहास संघर्षाचा आहे आणि तो पुसता येणार नाही,” असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या टीकेवर जोरदार हल्लाबोल केला.
 
या शाब्दिक युद्धामुळे पुन्हा एकदा मुंबई विरुद्ध नागपूर असा राजकीय वाद तापण्याची चिन्हे दिसत असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य अधिकच महत्त्वाचे मानले जात आहे.
 
Powered By Sangraha 9.0