राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव गावंडेंना हृदयविकाराचा झटका, नागपूरमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया

09 Jan 2026 17:13:43
 
NCP leader Gulabrao Gawande
 Image Source:(Internet)
नागपूर :
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) साठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी क्रीडा राज्यमंत्री गुलाबराव गावंडे (Gulabrao Gawande) यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला असून त्यांच्यावर नागपूरमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
 
गेल्या दोन दिवसांपासून गुलाबराव गावंडे यांना अस्वस्थपणा जाणवत होता. प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना तातडीने अकोल्यातील खासगी आयकॉन रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी नागपूरला हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना नागपूरच्या अर्नेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज सुमारे तीन तास चाललेल्या शस्त्रक्रियेदरम्यान त्यांच्या हृदयातील दोन ब्लॉकेज यशस्वीरीत्या काढण्यात आल्या.
 
ही माहिती त्यांचे सुपुत्र तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांनी दिली. “शस्त्रक्रिया पूर्णपणे यशस्वी झाली असून सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत,” असे त्यांनी सांगितले.
 
अकोला शहरातील कौलखेड परिसरातील रहिवासी असलेले गुलाबराव गावंडे हे विदर्भातील आक्रमक आणि थेट भूमिका घेणारे नेते म्हणून ओळखले जातात. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दीर्घकाळ काम करत विदर्भात पक्षसंघटन मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. युती सरकारच्या काळात मनोहर जोशी मंत्रिमंडळात त्यांनी सुमारे चार वर्षे विविध खात्यांचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली.
 
तीन वेगवेगळ्या मतदारसंघातून तीन वेळा विधानसभेत पोहोचण्याचा मान गुलाबराव गावंडेंना मिळाला आहे. १९९० मध्ये कारंजा, १९९५ मध्ये बोरगावमंजू (आताचा अकोला पूर्व) आणि २००४ मध्ये अकोट मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी विधानसभेत अंगावर रॉकेल ओतून घेतल्याची त्यांची कृती एकेकाळी राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती.
 
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिममधून त्यांना पराभव पत्करावा लागला असला, तरी त्यानंतरही ते पक्षात सक्रिय राहिले. त्यांच्या आजारपणाची माहिती मिळताच राजकीय वर्तुळात तसेच समर्थकांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0