उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का;नागपुरात बड्या नेत्यावर ईडीची धाड, राजकीय वर्तुळात खळबळ!

09 Jan 2026 15:22:47
 
Uddhav Thackeray group Image Source:(Internet)
नागपूर :
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असतानाच शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांना मोठा धक्का बसला आहे. मतदानाला अवघे सहा दिवस शिल्लक असताना ठाकरे (Thackeray) गटाचे नागपूर जिल्हाध्यक्ष उत्तम कापसे यांच्या घर आणि कार्यालयावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) छापेमारी केल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
 
नागपूर जिल्ह्यातील सावनेर, खापा आणि पाटणसावंगी परिसरात ईडीकडून एकाच वेळी जोरदार कारवाई सुरू करण्यात आली आहे. पहाटे सुमारे ५ वाजल्यापासून नागपूर आणि दिल्ली येथील ईडीच्या तब्बल १० पथकांनी विविध ठिकाणी छापे टाकले. अचानक झालेल्या या कारवाईमुळे नागपूरसह संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
 
२०२१ मधील रेती तस्करी प्रकरण-
ही कारवाई २०२१ मधील रेती तस्करी आणि बेकायदेशीर विक्री प्रकरणाशी संबंधित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात रेती विक्रीदरम्यान मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. याच प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून ईडीने ही छापेमारी केल्याचं सांगितलं जात आहे.
 
सावनेरमध्ये प्रफुल्ल कापसे, उत्तम कापसे, विनोद गुप्ता, लक्ष्मीकांत सातपुते आणि दादू कोलते यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले आहेत. तर पाटणसावंगीमध्ये शरद राय, मनोज गायकवाड आणि खापामध्ये अमित राय यांच्या घर व कार्यालयांची झडती सुरू आहे.
 
छापेमारीच्या टायमिंगवर प्रश्नचिन्ह-
ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षावर झालेल्या या कारवाईमुळे ईडीच्या टायमिंगवरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. काहीजण ही कारवाई राजकीय दबावाचा भाग असल्याचा आरोप करत आहेत, तर तपास यंत्रणा कायदेशीर प्रक्रियेनुसार काम करत असल्याचं सांगितलं जात आहे.
 
या छापेमारीमुळे शिवसेना (उद्धव ठाकरे गट) ची डोकेदुखी वाढली असून पुढील काळात ईडीकडून काय कारवाई होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. जर या प्रकरणात मोठी कारवाई झाली, तर निवडणुकीच्या ऐन वेळी ठाकरे गटासाठी तो मोठा राजकीय धक्का ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
 
Powered By Sangraha 9.0