Image Source:(Internet)
चंद्रपूर :
नागभीड तालुक्यातील मिन्थूर गावातील तरुण शेतकरी रोशन कुडे याची धक्कादायक कहाणी समोर येताच राज्यातील शेतकऱ्यांची बिकट अवस्था पुन्हा अधोरेखित झाली आहे. सावकारांच्या कर्जजाळ्यात अडकलेल्या रोशनकडे कर्ज फेडण्यासाठी कोणताही मार्ग उरला नव्हता. शेवटी जीवनाशी तडजोड करत त्याने कंबोडियात जाऊन आपली किडनी (Kidney) विकण्याचा टोकाचा निर्णय घेतला.
कंबोडियातून रोशनसह इतर काही शेतकऱ्यांना थेट व्हिएन्टिन येथे हलवण्यात आले. तेथे कॉल सेंटरमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवले गेले; मात्र प्रत्यक्षात त्यांना अमानुष छळाला सामोरे जावे लागले. दिवसाला १८ तासांहून अधिक काम, काम न केल्यास मारहाण, आणि पगार न देण्याची सक्ती—अशा भयावह परिस्थितीत त्यांना डांबून ठेवण्यात आले होते.
या प्रकरणाची माहिती मिळताच रोशनच्या कुटुंबीयांनी काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून वडेट्टीवार यांनी तातडीने पोलीस यंत्रणा आणि संबंधित देशातील भारतीय दूतावासाशी संपर्क साधत मदत कार्य सुरू केले.
रोशनने सुरुवातीला सावकाराकडून एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र अवास्तव व्याजामुळे हेच कर्ज काही काळात ५० लाखांवर पोहोचले. किडनी एक कोटी रुपयांना विकली गेली असली, तरी प्रत्यक्षात रोशनला केवळ पाच ते सात लाख रुपयांवर समाधान मानावे लागले. सततचा मानसिक व शारीरिक छळ यामुळे तो आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. अशा कठीण प्रसंगी काँग्रेसने त्याला आधार दिला.
या संपूर्ण प्रकरणामागे सावकार आणि अवयव तस्करी करणाऱ्या टोळीचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी विशेष समिती नेमण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
राज्यातील शेतकरी आज सावकारी आणि बँक कर्जाच्या ओझ्याखाली अक्षरशः चिरडला जात असल्याचे या घटनेतून स्पष्ट होते. एका शेतकऱ्याला वाचवण्यात यश आले असले, तरी अशा असंख्य शेतकरी कुटुंबांचा संघर्ष अजूनही सुरू आहे. रोशन कुडे यांनी माध्यमांसमोर आपली व्यथा मांडत संपूर्ण व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.