Image Source:(Internet)
मुंबई :
राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय हालचालींना वेग आला आहे. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्याने काही प्रभागांतील चित्र आधीच स्पष्ट झाले आहे.
महाविकास आघाडीतील उमेदवारांच्या माघारीचा थेट फायदा महायुतीला मिळताना दिसत आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या अनेक उमेदवारांची बिनविरोध निवड झाली असून, त्यामुळे विरोधकांची चिंता वाढली आहे. उपलब्ध माहितीनुसार आतापर्यंत महायुतीचे तब्बल ५७ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
दरम्यान, नागपुरात शिवसेना ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक २१ मधील ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार गौरव महाजन यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार अजय दलाल यांना जाहीर पाठिंबा देत आपल्या कार्यकर्त्यांसह थेट शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला. या घडामोडीमुळे नागपुरात शिंदे गटाची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे.
हीच परिस्थिती जळगावमध्येही पाहायला मिळाली. तेथे ठाकरे गटाच्या उमेदवाराने ऐनवेळी माघार घेतल्याने भाजपचा उमेदवार थेट विजयी ठरला. राज्यातील अनेक भागांत अपक्ष तसेच महाविकास आघाडीतील उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे महायुतीचे पारडे जड झाले आहे.
एकूणच, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर घडलेल्या या घडामोडींमुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची ताकद वाढताना दिसत असून, उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.