नागपूर : प्रेमसंबंधाच्या संशयातून रक्तरंजित हल्ला, अल्पवयीन मुलगी व भावंड गंभीर जखमी

08 Jan 2026 23:03:13
 
MURDER
 Image Source:(Internet)
नागपूर:
नागपूररात (Nagpur) प्रेमसंबंधाच्या संशयातून घडलेल्या एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलगी आणि तिच्या भावावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
 
यशोधरा नगरातील पिली नदी परिसरात ही थरारक घटना घडली. आरोपी कुणाल संतापे याने आधी मुलीच्या भावाशी वाद घालत शिवीगाळ केली. वाद वाढताच त्याने चाकू काढून तरुणावर वार केले, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. भावाला वाचवण्यासाठी अल्पवयीन मुलगी मध्ये पडताच आरोपीने तिच्यावरही निर्दयपणे चाकूने हल्ला चढवला.
 
जखमी भावंडांना तात्काळ मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. पोलिसांनी या प्रकरणी हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवून आरोपी कुणाल संतापेला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
 
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडित मुलीचा शेजारी राहत होता आणि दोघांमध्ये पूर्वी प्रेमसंबंध होते. मात्र कुटुंबीयांच्या हस्तक्षेपानंतर मुलीने त्याच्याशी संबंध तोडले होते. याच गोष्टीचा राग मनात धरून, तसेच मुलीचे इतर कोणाशी तरी संबंध असल्याच्या संशयातून आरोपीने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
Powered By Sangraha 9.0