Image Source:(Internet)
नागपूर/खापरखेडा :
सावनेर तालुक्यातील खैरी सावनेर (ढालगाव) गावात दूषित पाणी (Contaminated water) पिल्याने मोठी आरोग्य समस्या निर्माण झाली आहे. गावातील मुख्य पाणीपुरवठा वाहिनी तुटूनही वेळेत दुरुस्ती न झाल्याने सांडपाण्याची भेसळ झाली आणि हे दूषित पाणी थेट घरगुती नळांपर्यंत पोहोचले. यामुळे ८० हून अधिक ग्रामस्थ आजारी पडल्याची माहिती समोर आली आहे.
ग्रामस्थांना पोटदुखी, जुलाब, उलट्या अशा तक्रारी जाणवू लागल्या. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकही या आजाराच्या विळख्यात सापडले. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
दोन दिवसांत ९० रुग्णांवर उपचार-
सुरुवातीला १० ते १२ ग्रामस्थांना त्रास झाल्यानंतर त्यांनी खासगी डॉक्टरांकडे धाव घेतली. मात्र हळूहळू रुग्णसंख्या वाढत गेल्याने आशा सेविकांनी खापा प्राथमिक आरोग्य केंद्राला माहिती दिली. आरोग्य पथकाने तातडीने गावात दाखल होत वैद्यकीय शिबिर सुरू केले. दोन दिवसांत सुमारे ९० रुग्णांवर उपचार करण्यात आले. काही रुग्णांनी खासगी दवाखान्यातही उपचार घेतले. बुधवारी शिबिराचा समारोप करण्यात आला.
दरम्यान, ग्रामस्थांनी फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. या काळात कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी गावाला भेट दिली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
पाणीपुरवठा यंत्रणेकडे दुर्लक्ष-
गावात पाणी शुद्धीकरण केंद्र असून ते गेल्या चार वर्षांपासून बंद असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सुमारे १५ दिवसांपूर्वी मुख्य पाईपलाईन फुटली होती, मात्र अनेक दिवस दुरुस्ती झाली नाही. पाण्याच्या टाक्यांची नियमित स्वच्छता होत नाही, तसेच पाण्यात क्लोरीनही टाकले जात नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या संपूर्ण प्रकाराला ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरले जात आहे. काही ग्रामस्थांनी प्रशासनाने गावाची बदनामी टाळण्यासाठी हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही केला आहे.
घरोघरी जाऊन उपचार-
“हॉस्पिटल तुमच्या दारी” या उपक्रमांतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी भेटी देऊन नागरिकांची तपासणी केली व औषधे दिली. अनेक कुटुंबांतील दोन-तीन सदस्य एकाच वेळी आजारी पडल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. सततच्या जुलाबांमुळे अनेकजण अशक्त झाल्याचे दिसून आले.
उकळलेले पाणी वापरण्याचा सल्ला-
सांडपाण्याची भेसळ झाल्यामुळे हा आजार पसरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, गटविकास अधिकारी मनोज हिरुडकर यांनी ग्रामस्थांना किमान एक आठवडा पाणी उकळून, थंड करूनच वापरण्याचा सल्ला दिला आहे.