खून करण्याचा विचार होता, पण थांबलो…; नारायण राणेंचा धक्कादायक दावा

05 Jan 2026 13:03:34
 राजकारणातून बाजूला होण्याचे संकेत

Narayan RaneImage Source:(Internet) 
मुंबई:
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी कोकणात जोरदार शक्तिप्रदर्शन करत राजकीय वातावरण तापवले आहे. कणकवली येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना राणेंनी आपल्या राजकीय वाटचालीचा मागोवा घेतला, तसेच भूतकाळातील एक अत्यंत वादग्रस्त प्रसंग प्रथमच उघड केला.
 
भाजपमध्ये प्रवेश हा अंतिम टप्पा – राणे
आपल्या भाषणात नारायण राणे म्हणाले की, भाजपमध्ये प्रवेश करतानाच त्यांनी हा निर्णय शेवटचा असल्याचे स्पष्ट केले होते. “मी मानाने जगणारा माणूस आहे. आजपर्यंत ज्या जबाबदाऱ्या मिळाल्या, त्या माझ्या कर्तृत्वावर मिळाल्या. माझ्या राजकीय आयुष्याची दिशा मी स्वतः ठरवत गेलो,” असे त्यांनी सांगितले.
 
बाळासाहेब ठाकरेंमुळे मोठा अनर्थ टळला-
सभेदरम्यान राणेंनी एक धक्कादायक अनुभव कथन केला. “एका टप्प्यावर मी एका उपशाखाप्रमुखाचा खून करण्याचा विचार केला होता. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मला वेळीच समजावले आणि तो निर्णय बदलला,” असे राणे म्हणाले. या घटनेचा कालावधी त्यांनी स्पष्ट केला नसला, तरी या वक्तव्याने उपस्थितांमध्ये खळबळ उडाली.
 
निवृत्तीचा विचार, पण आत्मविश्वास अढळ-
राजकीय भूमिकांबाबत भाष्य करताना राणे म्हणाले, “आता मला कोणत्याही पदाची हाव नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वीही मी तिकीट नको असल्याचे सांगितले होते. मात्र पक्षनेतृत्वाने मला थांबवले. प्रत्येक टप्प्यावर मी स्वतःवर विश्वास ठेवला आणि तो आजही कायम आहे.”
 
राणे नाव संपवणं शक्य नाही-
आपल्याविरोधातील टीकांवर पलटवार करत राणे म्हणाले, “मला संपवण्याच्या चर्चा सुरू असतात, पण राणे नाव पुरून उरले आहे. माझा आत्मविश्वास मजबूत आहे. कार्यकर्त्यांना सांगण्यासाठीच मी इथे आलो आहे की राणे संपणार नाही. राणे कुटुंब एकसंघ राहील.
 
राणेंच्या या परखड आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे कोकणातील राजकीय चर्चांना पुन्हा वेग आला असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0