राजकारणात उलथापालथ; सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रीपदाची घेणार शपथ

31 Jan 2026 13:07:56
 
Sunetra Pawar
 Image Source:(Internet)
मुंबई :
भीषण विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आज सायंकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली असून, त्यामुळे बारामती आणि मुंबईतील राजकीय वातावरण तापले आहे.
 
28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निमित्ताने बारामतीत त्यांच्या चार सभा आयोजित होत्या. मात्र, सायंकाळी सुमारे 8.45 वाजता बारामती विमानतळाच्या जवळच त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून, विमानातील एकही प्रवासी वाचू शकला नाही. सुरुवातीला अजित पवार गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात आले, पण काही वेळातच त्यांच्या निधनाची अधिकृत घोषणा करण्यात आली. या घटनेमुळे राज्यभरात शोककळा पसरली. दरम्यान, अपघाताचे काही व्हिडीओ समोर आले असून, विमान हवेत असताना एका बाजूला झुकत असल्याचे त्यात स्पष्ट दिसते.
 
अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबावर मोठा आघात झाला असतानाच, उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे कोणाकडे जाणार याबाबत चर्चा सुरू झाल्या. त्यातच सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती पुढे आली. विशेष म्हणजे, या निर्णयाबाबत शरद पवार यांच्याशी कोणतीही सल्लामसलत झाली नसल्याचे सांगितले जात आहे.
 
यासंदर्भात शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना, “सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत, याची मला माहिती नाही. त्या शपथ घेणार आहेत की नाही, हेही मला माहीत नाही,” असे स्पष्ट केले. तसेच, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. “अजित पवार आणि माझीही इच्छा होती की राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यावी,” असे शरद पवार म्हणाले.
 
दरम्यान, सुनेत्रा पवार मुंबईत दाखल होताच बारामतीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार यांच्या भेटीसाठी संदीप क्षीरसागर, रोहित पवार बारामतीत पोहोचले असून, खासदार सुप्रिया सुळेही या वेळी उपस्थित आहेत. संदीप क्षीरसागर यांनी माध्यमांशी संवाद साधताना, “दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या दिशेने चर्चा सुरू होत्या,” असे म्हटले. शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आणखी काही नेते दाखल झाल्याची माहितीही सूत्रांकडून मिळत आहे.
 
अजित पवार यांच्या अचानक निधनानंतर निर्माण झालेल्या या घडामोडींमुळे राज्यातील राजकारणाला नवे वळण मिळण्याची चिन्हे असून, पुढील निर्णयांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
 
Powered By Sangraha 9.0