Image Source:(Internet)
मुंबई :
सुनेत्रा पवार यांच्या नावाची राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदासाठी चर्चा सुरू असताना शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर कडवी टीका केली आहे. “महाराष्ट्र अजूनही अजितदादांच्या निधनाच्या दुःखातून सावरलेला नाही. अशा वेळी या विषयावर राजकीय प्रतिक्रिया देणं योग्य नाही,” असं राऊत यांनी स्पष्ट केलं.
ते पुढे म्हणाले की, “अजितदादांच्या कुटुंबातील व्यक्ती भाजपच्या पाठबळावर उपमुख्यमंत्री होणार असेल, तर तो संबंधित पक्षाचा निर्णय आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाची मोठी फळी आहे. प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांसारखे राष्ट्रीय नेते पक्षात आहेत. त्यामुळे हा निर्णय वरिष्ठ स्तरावरच घेतला गेला असणार.”
या प्रकरणात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भूमिका असल्याचा आरोप करत राऊत म्हणाले, “सत्तेत असल्यामुळे हा निर्णय अमित शाह यांनीच घेतला असणार. भाजप हा ‘मढ्याच्या टाळूवरचं लोणी’ खाणारा पक्ष आहे. दुःखवट्याशी किंवा संवेदनशीलतेशी त्यांचा काहीही संबंध नसतो.”
या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हं दिसत असून, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होण्याच्या चर्चांभोवती राजकारण अधिक तीव्र होत असल्याचं चित्र आहे.