- स्थायी समितीची सूत्रे शिवानी दाणींकडे
Image Source:(Internet)
नागपूर :
नागपूर महानगरपालिकेतील (Nagpur Municipal Corporation) सत्तास्थापनेबाबत सुरू असलेल्या चर्चांना जवळपास पूर्णविराम मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाने महापालिकेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नावे निश्चित केली असून, अधिकृत घोषणा २ फेब्रुवारी रोजी अपेक्षित आहे. मात्र, पक्षातील विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील महापौर म्हणून दक्षिण नागपूरमधून निवडून आलेल्या सौ. नीता ठाकरे यांचे नाव आघाडीवर आहे. मध्य नागपूरचे नगरसेवक ॲड. संजय बालपांडे यांची उपमहापौरपदी निवड होण्याची दाट शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातील तरुण नगरसेविका शिवानी दाणी यांच्याकडे महापालिकेच्या स्थायी समितीचे नेतृत्व सोपवले जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे महापालिकेच्या आर्थिक निर्णयांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान, पूर्व नागपूर मतदारसंघातून सर्वाधिक नगरसेवक निवडून आणणारे ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र ऊर्फ बाल्या बोरकर यांची सत्तापक्ष नेतेपदी निवड निश्चित मानली जात आहे. अंतिम टप्प्यात काही नावांमध्ये बदल होण्याची शक्यता मात्र सूत्रांनी नाकारलेली नाही.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजपच्या सर्व आमदारांच्या उपस्थितीत राजवाडा पॅलेसमध्ये झालेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या बैठकीत या नावांवर सहमती झाल्याचे समजते. सुरुवातीला महापौरपदासाठी शिवानी दाणी यांचे नाव चर्चेत होते, मात्र अखेर अनुभवी नेतृत्व म्हणून नीता ठाकरे यांच्यावर पक्ष नेतृत्वाने विश्वास व्यक्त केला.
यंदाच्या सत्तारचनेत उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्राला प्रमुख पदांपासून दूर ठेवण्यात आल्याचे चित्र आहे. या भागातील नगरसेवकांना विविध समित्यांच्या सभापतीपदांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. पक्षाच्या अंतर्गत नियोजनानुसार महापौर आणि उपमहापौरांचा कार्यकाळ प्रत्येकी सव्वा वर्षांचा राहणार असून, त्यामुळे पाच वर्षांच्या कालावधीत नागपूरला चार महिला महापौर आणि चार महिला उपमहापौर मिळणार आहेत. स्थायी समिती सभापती आणि सत्तापक्ष नेत्यांचा कार्यकाळ मात्र प्रत्येकी एक वर्षाचा असणार आहे.
उपमहापौरपदासाठी संजय बालपांडे यांचे नाव पुढे असले तरी त्यांनी हे पद स्वीकारण्याबाबत साशंकता व्यक्त केल्याची चर्चा आहे. मात्र, पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानुसार अंतिम भूमिका ठरणार असल्याचे भाजपमधील जाणकारांचे म्हणणे आहे. नव्या सत्तारचनेमुळे नागपूर महापालिकेची पुढील वाटचाल कोणत्या दिशेने होईल, याकडे आता शहराचे लक्ष लागले आहे.