Image Source:(Internet)
ठाणे :
ठाणे महानगरपालिकेतील (Thane Municipal Corporation) महापौर आणि उपमहापौर पदासाठीची निवडणूक कोणताही संघर्ष न होता बिनविरोध पार पडली. शिवसेना (शिंदे गट) यांच्या शर्मिला पिंपळोलकर या महापौरपदी, तर भाजपच्या कृष्णा पाटील या उपमहापौरपदी विराजमान होणार आहेत. येत्या ३ फेब्रुवारी रोजी या निवडीची औपचारिक घोषणा केली जाणार आहे.
युतीत निवडणूक लढविल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने सुरुवातीला महापौरपदावर दावा ठोकला होता. ही मागणी मान्य न झाल्यास विरोधी बाकावर बसण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, सत्तेत सहभागी होण्यासाठी अखेर भाजपने आपला आग्रह मागे घेत शिंदे गटासोबत तडजोडीचा मार्ग स्वीकारला.
शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम वेळेपर्यंत महापौर आणि उपमहापौर पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने दोन्ही पदांवरील निवड बिनविरोध निश्चित झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे अर्ज सादर करण्यात आले.
१३१ सदस्यीय ठाणे महापालिकेत शिंदे गटाच्या शिवसेनेकडे ७५ नगरसेवकांचे संख्याबळ असून एका अपक्षाच्या पाठिंब्याने हे बळ ७६ वर पोहोचले आहे. सत्तेसाठी आवश्यक असलेले बहुमत आधीच गटाकडे असल्याने महापौरपद शिवसेनेकडे जाणे जवळपास निश्चित होते.
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या महापौरपदासाठी अनेक नावे चर्चेत होती. अखेर कोपरी प्रभागातून निवडून आलेल्या शर्मिला पिंपळोलकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजपने उपमहापौरपदासाठी कृष्णा पाटील यांची निवड केली.
सत्ता वाटपाच्या सूत्रानुसार भाजपला पाच वर्षांच्या कालावधीत पहिला आणि शेवटचा सव्वा वर्ष उपमहापौरपद, तीन प्रभाग समित्या, दोन विशेष समित्या तसेच स्थायी व परिवहन समितीच्या सभापतीपदाचा प्रत्येकी एक वर्षाचा कार्यकाळ देण्यावर दोन्ही पक्षांत एकमत झाले आहे.
कोपरीला पहिल्यांदाच महापौरपदाचा मान-
या निवडीमुळे कोपरी परिसराला प्रथमच महापौरपद मिळाले असून, आतापर्यंत ठाणे शहर व वागळे इस्टेट परिसराकडे गेलेले हे पद आता कोपरीकडे आले आहे. त्यामुळे या भागात समाधान आणि अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.