सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ; राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदावर प्रथमच महिला नेतृत्व

    31-Jan-2026
Total Views |
 
Sunetra Pawar takes oath as DCM
 Image Source:(Internet)
मुंबई :
राज्याच्या राजकारणात आज एक ऐतिहासिक घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय जोडला. या पदावर निवड झालेल्या त्या राज्यातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्य, सत्ताधारी पक्षांचे नेते तसेच अनेक आमदार उपस्थित होते.
 
 
 
शपथविधीपूर्वी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. या निवडीनंतर त्यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
 
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वाबाबत तसेच उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्क सुरू होते. अखेर सुनेत्रा पवार यांच्या नावावर अधिकृत शिक्का बसल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
 
आजच्या बैठकीत पक्षाने दोन महत्त्वाचे ठराव मंजूर केले. पहिल्या ठरावानुसार सुनेत्रा पवार यांच्याकडे विधिमंडळ गटनेतेपदाची धुरा सोपवण्यात आली, तर दुसऱ्या ठरावानुसार पक्षातील निर्णयप्रक्रियेचे संपूर्ण अधिकार त्यांना देण्यात आले. दोन्ही ठरावांना उपस्थित आमदारांचा एकमताने पाठिंबा मिळाला.
 
राज्यसभेतील खासदार म्हणून संसदीय कामकाजाचा अनुभव असलेल्या सुनेत्रा पवार आता राज्याच्या कार्यकारी सत्तेत निर्णायक भूमिका बजावणार आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवचैतन्य संचारले असून, महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात झाल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत.