अमेरिकेत हिमवादळाचा कहर; बर्फाळ रस्त्यांवर शेकडो वाहनं अडकली, थंडीमुळे 50 हून अधिक जणांचा मृत्यू

30 Jan 2026 16:08:30
 
Snowstorm in America
 Image Source:(Internet)
वॉशिंग्टन:
अमेरिकेत (America) कडाक्याच्या थंडीने आणि तीव्र हिमवादळाने जनजीवन अक्षरशः ठप्प झाले आहे. अनेक राज्यांमध्ये रस्ते पूर्णपणे बर्फाने झाकले गेले असून, वाहनचालकांसह नागरिक मोठ्या प्रमाणावर अडकले आहेत. मिसिसिपी राज्यातील परिस्थिती अधिक गंभीर असून अनेक महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
 
मिसिसिपीमधील इंटरस्टेट 55 या प्रमुख महामार्गावर शेकडो वाहने अडकून पडली होती. बर्फामुळे वाहनांची हालचाल अशक्य झाल्याने अनेक तास लोक रस्त्यावरच अडकून राहिले. अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांनी रात्रभर तसेच बुधवारी सकाळपर्यंत मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवली.
 
मिसिसिपीचे गव्हर्नर टेट रीव्हज यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती देताना सांगितले की अडकलेल्या वाहनांचा आणि नागरिकांचा शोध घेण्यासाठी टो ट्रक तसेच ड्रोनचा वापर करण्यात आला आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर न पडण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या आपत्कालीन सेवांतील कर्मचाऱ्यांसाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
 
या तीव्र थंडी आणि बर्फवृष्टीमुळे आतापर्यंत अमेरिकेत किमान 50 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये काही अत्यंत हृदयद्रावक घटनांचा समावेश आहे. टेक्सास राज्यात गोठलेल्या तलावात पडून 6, 8 आणि 9 वर्षांच्या तीन भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर व्हर्जिनियामध्ये एका लहान मुलाचा तलावात पडून उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
 
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, बुधवारी मध्यपश्चिम आणि ईशान्य अमेरिकेतील अनेक भागांमध्ये तापमान गोठणबिंदूपेक्षा खालीच राहणार आहे. दक्षिणेकडील राज्यांनाही या थंडीपासून फारसा दिलासा मिळालेला नाही. टेनेसी राज्यातील नॅशव्हिल शहरात जवळपास एक लाख घरांमध्ये अजूनही वीजपुरवठा खंडित आहे.
 
दिवसा तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता असली, तरी रात्री तापमान उणे 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विजेअभावी अनेक नागरिक घर गरम ठेवण्यासाठी जनरेटर, गॅस हीटर, स्टोव्ह आणि फायरप्लेसचा वापर करत आहेत. मात्र, यामुळे कार्बन मोनोऑक्साइड विषबाधेचा धोका वाढला आहे.
 
नॅशव्हिलमधील एका रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, विषारी वायूच्या परिणामामुळे गेल्या शनिवारीपासून आतापर्यंत 48 मुलांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.
Powered By Sangraha 9.0