सरकारी विमानांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; ६ कोटींचा जीआर जारी

30 Jan 2026 16:43:00
 
Maha Govt
 Image Source:(Internet)
मुंबई :
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सरकारी विमानांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर पावले उचलली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने सरकारी विमानं आणि हेलिकॉप्टर्सच्या तातडीच्या देखभाल व दुरुस्तीसाठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे.
 
राज्याच्या मालकीची हवाई वाहने ही अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासह आपत्कालीन सेवांसाठी वापरली जात असल्याने त्यांची तांत्रिक स्थिती सदैव सुस्थितीत असणे आवश्यक मानले जाते. त्यामुळेच या विमानांच्या दुरुस्ती, देखभाल आणि आवश्यक यंत्रसामुग्रीसाठी अतिरिक्त निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात या कामांसाठी पुरवणी मागणी सादर करण्यात आली होती. त्या प्रस्तावाला वित्त विभागाच्या व्यय अग्रक्रम समितीने मंजुरी दिल्यानंतर आता प्रत्यक्ष निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीमुळे विमानचालन संचालनालयाला तातडीची दुरुस्ती, सुटे भाग खरेदी आणि आवश्यक तांत्रिक कामे अडथळ्याविना करता येणार आहेत.
 
सरकारी विमानांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास महत्त्वाचे दौरे रद्द होण्याची किंवा विलंबाची शक्यता असते. नव्या निधीमुळे अशा अडचणी टाळता येणार असून, हवाई ताफ्याची सुरक्षितता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
Powered By Sangraha 9.0