सोन्याचा दर धाडकन कोसळला, चांदीही घसरली; तेजीला अचानक ब्रेक, आजचे नवे दर काय?

30 Jan 2026 14:29:37
 
Gold silver
 Image Source:(Internet)
मुंबई:
गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सुरू असलेल्या प्रचंड तेजीला शुक्रवारी अचानक ब्रेक लागला आहे. सोनं (Gold) आणि चांदीच्या वाढत्या किमतींमुळे चिंतेत असलेल्या ग्राहकांसाठी ही घसरण काहीसा दिलासा देणारी ठरू शकते. 29 जानेवारी रोजी विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर आज, 30 जानेवारी रोजी सकाळपासूनच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली.
 
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सुरुवातीच्या व्यवहारात सोनं आणि चांदी दोन्हीही 5 टक्क्यांहून अधिक घसरले. गुरुवारी जोरदार तेजीत असलेला बाजार आज पूर्णपणे उलट दिशेने जाताना दिसून आला. एमसीएक्सवर सोन्याचा दर 5.55 टक्क्यांनी घसरून 10 ग्रॅमसाठी 1,60,001 रुपयांवर आला. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच सोनं 1,93,096 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले होते. आज मात्र एका दिवसातच सोन्याच्या दरात सुमारे 9,402 रुपयांची मोठी घसरण नोंदवली गेली आहे.
 
दुसरीकडे, चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. एमसीएक्सवर चांदीचा भाव 4.18 टक्क्यांनी घसरून प्रतिकिलो 3,83,177 रुपयांवर आला. अवघ्या एका दिवसात चांदीच्या दरात तब्बल 16,716 रुपयांची घसरण झाली आहे. गुरुवारी चांदीने 4,20,048 रुपये प्रति किलोचा नवा विक्रम प्रस्थापित केला होता, मात्र आज नफा वसुलीमुळे किमतींवर दबाव आला.
 
फक्त फ्युचर्स मार्केटच नव्हे, तर किरकोळ बाजारातही मंदीचे चित्र दिसून येत आहे. सामान्य ग्राहकांसाठी ही खरेदीची संधी मानली जात आहे. बुलियन मार्केटमधील माहितीनुसार, 30 जानेवारी रोजी किरकोळ बाजारात सोन्याचा दर 5,300 रुपयांनी घसरून 10 ग्रॅमसाठी 1,65,180 रुपये झाला आहे. त्याचप्रमाणे चांदीचा दरही मोठ्या प्रमाणात घसरत प्रतिकिलो 3,79,130 रुपयांवर आला असून, यात 23,360 रुपयांची घट झाली आहे.
 
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून येत आहे. जागतिक स्तरावर स्पॉट गोल्ड 1.65 टक्क्यांनी घसरून 5,217 डॉलर प्रति औंसवर आला आहे. एका दिवसाआधीच स्पॉट गोल्डने 5,594.82 डॉलर प्रति औंसचा विक्रमी उच्चांक गाठला होता. त्याचबरोबर स्पॉट चांदीचा दरही 2.86 टक्क्यांनी घसरून 110 डॉलर प्रति औंसवर आला आहे.
 
सोन्या-चांदीच्या दरात झालेली ही अचानक घसरण पुढील काही दिवसांत बाजाराची दिशा कोणती असेल, याकडे गुंतवणूकदारांसह ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0