प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा दबदबा; गणेशोत्सवाच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक

29 Jan 2026 20:11:57
 
Republic Day
 Image Source:(Internet)
नवी दिल्ली :
कर्तव्य पथावर पार पडलेल्या ७७व्या प्रजासत्ताक दिन (Republic Day) संचलनातील चित्ररथ स्पर्धेचे निकाल जाहीर झाले असून महाराष्ट्राने यंदा अव्वल स्थान मिळवले आहे. सांस्कृतिक ठसा उमटवत महाराष्ट्राचा चित्ररथ परीक्षकांच्या पसंतीस उतरला.
 
“गणेशोत्सव : आत्मनिर्भरतेचा उत्सव” या विषयावर आधारित महाराष्ट्राच्या चित्ररथात गणेशोत्सवाची सामाजिक, सांस्कृतिक आणि विकासात्मक भूमिका प्रभावीपणे मांडण्यात आली होती. लोकसहभाग, स्वावलंबन आणि एकतेचा संदेश देणारे हे सादरीकरण विशेष लक्षवेधी ठरले.
 
जम्मू–काश्मीरच्या चित्ररथाने दुसरा क्रमांक पटकावत हस्तकला आणि लोकनृत्यांच्या माध्यमातून येथील समृद्ध परंपरेचे दर्शन घडवले. तर जलमेट्रो प्रकल्प आणि १०० टक्के डिजिटल साक्षरतेचा संदेश देणाऱ्या केरळच्या चित्ररथाला तिसरा क्रमांक मिळाला.
 
यंदाच्या संचलनात देशभरातील राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि विविध केंद्रीय मंत्रालयांचे ३०पेक्षा अधिक चित्ररथ सहभागी झाले होते. भारताची संस्कृती, प्रगती आणि राष्ट्रभावना अधोरेखित करणाऱ्या या चित्ररथांनी कर्तव्य पथावर रंगत आणली.
Powered By Sangraha 9.0