काटेवाडीमध्ये अजित पवारांना शासकीय मानवंदना; आज अखेरचा निरोप

29 Jan 2026 11:41:13
 
Ajit Pawar
 Image Source:(Internet)
बारामती :
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पार्थिवाला आज काटेवाडी येथे शासकीय मानवंदना देण्यात येणार आहे. अजित पवारांना आज अखेरचा निरोप दिला जाणार असून बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. या अंत्यसंस्काराला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.
 
अजित पवार यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात चाहते, समर्थक, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांची मोठी गर्दी जमली आहे. बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून नागरिकांच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अंत्यदर्शनासाठी जनसागर उसळला असून अनेक नागरिक धाय मोकलून रडताना दिसत आहेत.
 
दरम्यान, अजित पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. विमान लँडिंग करत असतानाच हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघाताचे भीषण फोटो आणि व्हिडिओ समोर आले असून विमान उतरत असताना ते थेट एका शेतात कोसळल्याचं या दृश्यांमध्ये स्पष्ट दिसत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं होतं.
 
एका कणखर, निर्णयक्षम आणि महाराष्ट्राच्या राजकारणात ठसा उमटवणाऱ्या नेत्याच्या जाण्याने राज्यावर शोककळा पसरली असून अजित पवारांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी असल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे.
 
Powered By Sangraha 9.0