महाराष्ट्रातील बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाशी संबंधित घटनेची चर्चा सुरू असतानाच, आंतरराष्ट्रीय स्तरावरून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोलंबियामध्ये (Colombia) लहान प्रवासी विमान कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एक विद्यमान खासदार आणि आगामी विधानसभा निवडणुकीतील उमेदवाराचाही समावेश आहे.
हा अपघात व्हेनेझुएलाच्या सीमेलगत घडला. विमान लँडिंगसाठी येत असताना अचानक त्याचा हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. नागरी विमान वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे ट्विन-प्रोपेलर बीचक्राफ्ट 1900 प्रकारचे विमान होते. सरकारी विमान कंपनी ‘सतेना’कडून हे विमान चालवले जात होते, मात्र ते एका खासगी कंपनीकडून भाड्याने घेण्यात आले होते.
23 मिनिटांचा प्रवास ठरला शेवटचा-
हे विमान काल दुपारी कोलंबियातील कुकुटा शहरातून ओकाना येथे जाण्यासाठी उड्डाण करत होते. अवघ्या 23 मिनिटांच्या या प्रवासातच अपघात झाला. विमानात 13 प्रवासी आणि 2 कर्मचारी होते. या दुर्घटनेत कोणीही वाचल्याची शक्यता नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट-
विमान कोसळण्यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. कोलंबियन सरकारने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले असून, हवाई दलाच्या मदतीने शोध व बचाव मोहिम राबवली जात आहे.
विमानाचे अवशेष अँडीज पर्वतरांगांच्या पूर्व भागात सापडले आहेत. हा परिसर अत्यंत दुर्गम असून, खडकाळ भूभाग, दाट जंगल आणि सतत बदलणारे हवामान यामुळे मदतकार्य कठीण झाले आहे. तसेच, हा भाग ELN (नॅशनल लिबरेशन आर्मी) या सशस्त्र संघटनेच्या प्रभावाखाली असल्याचीही माहिती आहे.
राजकीय क्षेत्रात शोककळा-
प्रशासनाने आतापर्यंत सात मृतदेह सापडल्याची पुष्टी केली आहे. उत्तर सँटँडर प्रांताचे गव्हर्नर विल्यम विलामिझर यांनी स्थानिक माध्यमांना सांगितले की, या विमानात कोलंबियाच्या चेंबर ऑफ डेप्युटीजचे 36 वर्षीय खासदार डायोजेनेस क्विंटेरो आणि विधानसभा निवडणुकीतील उमेदवार कार्लोस साल्सेडो प्रवास करत होते. या दोघांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे.