समीर वानखेडेंच्या याचिकेला न्यायालयाचा नकार; आर्यन खानच्या वेबसीरिजला दिलासा

29 Jan 2026 18:02:41
 
Sameer Wankhede
 Image Source:(Internet)
मुंबई :
माजी एनसीबी व आयआरएस अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना दिल्ली उच्च न्यायालयात मानहानी प्रकरणात अपयश आले आहे. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने दिग्दर्शित केलेल्या नेटफ्लिक्सवरील ‘द बार्ड्स ऑफ बॉलिवूड’ या वेब सीरिजविरोधात दाखल करण्यात आलेली दोन कोटी रुपयांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.
 
या वेब सीरिजमधील एका व्यक्तिरेखेचे चित्रण स्वतःशी साम्य दर्शवते आणि त्यामुळे आपली तसेच तपास यंत्रणांची प्रतिमा डागाळली जात असल्याचा आरोप वानखेडे यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी संबंधित दृश्ये हटवण्यासह नुकसानभरपाईची मागणी केली होती. प्रस्तावित नुकसानभरपाईची रक्कम टाटा मेमोरियल कॅन्सर रुग्णालयाला देण्याचा हेतू असल्याचेही त्यांनी नमूद केले होते.
 
अधिकार क्षेत्रावर आक्षेप-
या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांनी न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राचा मुद्दा उपस्थित केला. वानखेडे हे मुंबईचे रहिवासी असून, संबंधित वेब सीरिजची निर्मिती करणारी ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’ ही कंपनीदेखील मुंबईत कार्यरत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयात होऊ शकत नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने याचिका नामंजूर केली. मात्र, योग्य न्यायालयात म्हणजेच मुंबईत याचिका दाखल करण्याचा पर्याय वानखेडेंना खुला ठेवण्यात आला आहे.
 
जुन्या प्रकरणाची पुन्हा उजळणी-
२०२१ मधील मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली आर्यन खानला अटक करण्यात आली होती. मात्र, पुढे पुराव्यांच्या अभावामुळे आर्यन खानची निर्दोष मुक्तता झाली. त्यानंतर वानखेडे यांच्यावर खंडणी व भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. आता आर्यन खानच्या दिग्दर्शनातील पहिल्याच वेब सीरिजमुळे हा वाद पुन्हा चर्चेत आला आहे.
 
या निकालामुळे आर्यन खान आणि नेटफ्लिक्सला मोठा दिलासा मिळाला असून, समीर वानखेडे पुढे कोणती कायदेशीर भूमिका घेतात, याकडे लक्ष वेधले जात आहे.
Powered By Sangraha 9.0