नागपूर महापालिकेत 6 फेब्रुवारीला महापौर-उपमहापौर निवडणूक; भाजपाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू

29 Jan 2026 19:59:58
 
Mayor elections
Image Source:(Internet)
नागपूर :
नागपूर महानगरपालिकेतील (Nagpur Municipal Corporation) महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीबाबत सुरू असलेल्या सर्व तर्कवितर्कांना आता पूर्णविराम मिळाला आहे. नगर परिषद प्रशासन विभागाने निवडणूक कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर केला असून, 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता महापालिकेची विशेष सभा बोलावण्यात आली आहे. याच सभेत महापौर व उपमहापौर पदासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
 
या विशेष सभेचे अध्यक्षस्थान पीठासीन अधिकारी विपिन इटनकर भूषवणार आहेत. जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, निवडणूक प्रक्रिया नियमांनुसार, पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने पार पाडली जाईल. निवडणुकीशी संबंधित सर्व कार्यवाहीची अधिकृत नोंद प्रशासनाकडे सादर करणे पीठासीन अधिकाऱ्यांवर बंधनकारक असेल.
 
महापालिका सभागृहातील संख्याबळ पाहता भारतीय जनता पक्षाने 102 जागा जिंकून स्पष्ट बहुमतासह सत्ता मिळवली आहे, त्यामुळे महापौर पदावर भाजपाचाच दावा मजबूत मानला जात आहे. मात्र, महापौर निवडणुकीपूर्वी भाजपाला आपला गटनेता निश्चित करून विभागीय आयुक्त कार्यालयात गट नोंदणी करणे आवश्यक आहे. सध्या ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
 
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय हालचालींना काहीसा ब्रेक लागल्याने गट नोंदणी प्रक्रियेला उशीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार 30 जानेवारीपर्यंत भाजपाकडून गट नोंदणी पूर्ण केली जाण्याची शक्यता आहे.
 
निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच भाजपाच्या गोटात हालचालींना वेग आला असून, महापौर पदासाठी इच्छुकांची नावे चर्चेत आली आहेत. नागपूरचा पुढील महापौर कोण होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0