अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्रात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा; आज शासकीय सुट्टी जाहीर

28 Jan 2026 15:41:51
 
Ajit Pawar
 Image Source:(Internet)
मुंबई:
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात तीव्र शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आजचा दिवस शासकीय सुट्टी म्हणून जाहीर केला असून, राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा पाळण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजित पवार यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करत शोकसंदेश दिला. “आज मी एक दमदार, दिलदार आणि जिव्हाळ्याचा मित्र गमावला आहे,” अशा भावनिक शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अत्यंत अनाकलनीय परिस्थितीत विमान अपघातात अजितदादा पवार यांचे निधन झाल्याची बातमी समोर येताच संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाल्याचे त्यांनी नमूद केले.
 
अजित पवार हे जनतेशी घट्ट नाळ असलेले लोकनेते होते. राज्याच्या कानाकोपऱ्याची अचूक माहिती, सामान्य माणसाच्या प्रश्नांची सखोल जाण आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. जनसामान्यांमध्ये त्यांच्याविषयी प्रचंड आपुलकी आणि विश्वास होता, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
 
संघर्षशील वृत्ती, कठीण परिस्थितीतही न डगमगता पुढे जाण्याची क्षमता आणि स्पष्ट निर्णयक्षमता ही अजित पवार यांची खास ओळख होती. महाराष्ट्राच्या विकास प्रक्रियेत त्यांनी दिलेले योगदान मोलाचे असून, अशा निर्णायक टप्प्यावर त्यांचे अचानक जाणे ही राज्यासाठी मोठी हानी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केले.
 
“अशा प्रकारचे नेतृत्व घडायला अनेक वर्षे लागतात. त्यांच्या निधनाने मनाला चटका लावणारी पोकळी निर्माण झाली आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.
Powered By Sangraha 9.0