Image Source:(Internet)
बारामती:
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर बिग बॉस मराठी सिझन ५ चे विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) भावूक झाले आहेत. त्यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक भावपूर्ण पोस्ट शेअर करत अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
सूरजने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “माझा देव चोरला! मला अजिबात विश्वास बसेल असं नाही की आपले लाडके कार्यसम्राट अजित दादा आता आपल्यात नाहीत. माझ्यासारख्या गरीब मुलाला त्यांनी सोन्यासारखा घर दिलं, माझी काळजी घेतली आणि मला नवीन आयुष्य दिलं. अजित दादांसारखा देव माणूस या जगात कुणी नाही. माझ्या आई-आप्पानंतर अजित दादांनी माझ्यासाठी जे काही केलं, त्याची मी आयुष्यभर कदर करीन.”
अजित पवार हे मुंबईहून बारामतीसाठी जाणाऱ्या खासगी विमानात होते. बारामती विमानतळाजवळील शेतात विमान कोसळल्याने जोरदार स्फोट झाला. या भीषण अपघातात अजित पवारांसह विमानातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघाताचा सीसीटीव्ही फुटेजही सार्वजनिक झाला असून, या घटनेने महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.
अजित पवार हे राज्यातील रुबाबदार आणि जनप्रिय नेते होते. त्यांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा धक्का बसला आहे.