Image Source:(Internet)
बारामती:
मुंबईहून बारामतीकडे प्रवास करत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमानाला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांचे निधन झाल्याची माहिती समोर येताच राज्यातील राजकारण हादरले असून, सर्वत्र शोककळा पसरली आहे. मंगळवारी सकाळी आलेल्या या धक्कादायक वृत्ताने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला.
सकाळी साडेआठच्या सुमारास विमान अपघाताची प्राथमिक माहिती समोर आली होती. सुरुवातीला अजित पवार गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र काही वेळातच त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती जाहीर झाली आणि राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.
या दु:खद घटनेनंतर पवार कुटुंबावर आघात झाला आहे. निधनाची बातमी समजताच पत्नी सुनेत्रा पवार, जय पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे तातडीने दिल्लीहून बारामतीत दाखल झाले.
बारामती विमानतळावर कुटुंबीय पोहोचल्यानंतर शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि जुने सहकारी विठ्ठल शेठ मणियार उपस्थित होते. त्यांना पाहताच सुप्रिया सुळे भावनाविवश झाल्या. “तो आमचा लाडका होता… असं काय घडलं?” असे म्हणत त्यांनी अश्रू अनावर झाल्याने हंबरडा फोडला. अजित पवार लहानपणापासून मणियार यांचे विशेष लाडके होते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
याच वेळी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनाही अश्रू आवरता आले नाहीत. अजित पवार यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, बारामती येथील रुग्णालयात अजित पवार यांचे पार्थिव ठेवण्यात आले असून, तेथे कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी गर्दी जमली आहे.
अंत्यदर्शन व अंत्यसंस्काराचा तपशील-
कुटुंबीय व प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी ४ वाजल्यापासून अजित पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरी चौक येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. नागरिकांना रात्री उशिरापर्यंत दर्शन घेता येईल.
उद्या गुरुवारी सकाळी ९ वाजता गदिमा सभागृह येथून अंत्ययात्रेला प्रारंभ होईल. ही अंत्ययात्रा विद्या प्रतिष्ठान चौक व भिगवण रोड सेवा रस्त्याने मार्गक्रमण करेल. सकाळी ११ वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर संपूर्ण शासकीय इतमामात अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.