Image Source:(Internet)
नागपूर :
राज्यात निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच शिवसेना ठाकरे (Thackeray) गट यांना लातूर जिल्ह्यात मोठा राजकीय धक्का बसला आहे. औसा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिनकरराव माने यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत आपल्या समर्थक व कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून ठाकरे गटाची ताकद लातूरमध्ये कमकुवत झाल्याचे मानले जात आहे.
महानगरपालिका व नगरपालिका निवडणुकांनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पक्षांतर झाल्याने ग्रामीण भागातील राजकीय समीकरणांवर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. निवडणूक रणधुमाळीत ठाकरे गटासाठी हा आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे.
लातूर येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत माने यांचा अधिकृत पक्षप्रवेश पार पडला. यावेळी उपजिल्हा प्रमुख संतोष सूर्यवंशी, तालुका प्रमुख आबासाहेब पवार, तालुका संघटक श्रीराम कुलकर्णी, माजी तालुका प्रमुख संजय उजळबे, तालुका समन्वयक प्रदीप रणखांब, उपतालुका समन्वयक महादेव साळुंखे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले.
या पक्षप्रवेशामुळे लातूर जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक ताकद वाढली असून आगामी निवडणुकांमध्ये याचे पडसाद उमटतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.