खाकी वर्दीतला ड्रग्ज माफिया; अहिल्यानगर पोलिस हवालदारासह तस्करी करणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांच्या बेड्या

27 Jan 2026 17:21:23
 
arrests smuggling gang
 Image Source:(Internet)
पुणे:
पोलिसांची खाकी वर्दी हा समाजात सुरक्षा आणि न्यायाचा प्रतीक मानला जातो. मात्र, अहिल्यानगर (Ahilyanagar) पोलिस दलातील एका हवालदाराने या वर्दीला काळा डाग लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अहिल्यानगर पोलीस दलातील हवालदार शामसुंदर गुजर आणि त्याच्या टोळीवर अंमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
 
पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासात समोर आले आहे की, अहिल्यानगर पोलिसांनी जप्त केलेले अंमली पदार्थ मुद्देमाल कक्षातून चोरी करून शामसुंदर गुजर आणि त्याच्या टोळीने त्याचा विक्री व्यवसाय चालवला आहे. विशेष म्हणजे, शामसुंदर गुजर हा स्वतःच अंमली पदार्थ विक्रीमध्ये सक्रिय असल्याचा शोध लागल्याने पोलीस दलात मोठा धक्का बसला आहे.

प्रकरणाचा तपशील-
हा प्रकार १७ जानेवारी २०२६ रोजी शिरूर तालुक्यातील गॅरेज चालक शादाब शेख यांच्या अटकीनंतर उघडकीस आला. शादाब शेखवर दुचाकीवरून अमली पदार्थांची तस्करी करण्याचा संशय होता. त्याच्याकडून एक किलो अंमली पदार्थ जप्त झाला. चौकशीत त्याने अहिल्यानगर परिसरातील ज्ञानदेव उर्फ माऊली शिंदे, ऋषिकेश चित्तर, महेश गायकवाड यांच्याकडून मिळालेला अमली पदार्थ घेऊन येण्याचा स्वीकार केला.
 
पुणे ग्रामीण पोलिसांनी या टोळीच्या अन्य सदस्यांना अटक केली असता त्यांच्याकडे ९ किलो ६५५ ग्रॅम अमली पदार्थ हस्तगत करण्यात आला. पुढील चौकशीत कळले की हा मोठा खेळ अहिल्यानगर पोलीस दलातील शामसुंदर गुजर यांच्या सहकार्याने होत आहे.
 
गंभीर आरोप आणि शंका-
शामसुंदर गुजर हा अहिल्यानगर पोलिस दलात पोलीस हवालदार पदावर असून मुद्देमाल कक्षात ठेवलेले जप्त अंमली पदार्थ चोरी करून विक्री करीत होता. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत एकूण १० किलो ७०७ ग्रॅम अमली पदार्थ जप्त केले आहेत.
मुद्देमाल कक्षातील वस्तूंची सुरक्षा आणि त्याचा वापर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहीने केला जातो, त्यामुळे या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सहभागाची शक्यता वर्तवली जात आहे.
 
पुढील कारवाई-
पोलिसांनी या टोळीतील ५ आरोपींना ताब्यात घेतले असून, १० किलो ७०० ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ आणि गुन्ह्यात वापरलेली वाहनेही जप्त केली आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांनी याबाबत अधिक तपास सुरू ठेवला आहे. सध्या राजकीय लोकांचा सहभाग आढळून आलेला नसला तरी या बाबतीत सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
Powered By Sangraha 9.0