मानकर ट्रस्टकडून आदिवासी महिलांसाठी विमा सुरक्षा; गडकरींच्या उपस्थितीत 2026 परिवर्तन रोडमॅप सादर

    27-Jan-2026
Total Views |
 
Nitin Gadkari
 Image Source:(Internet)
नागपूर :
आदिवासी व ग्रामीण समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था अधिक व्यापक आणि नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करणार असून, आरोग्य, शिक्षण व आर्थिक सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले. या वेळी संस्थेच्या वतीने राज्यातील एक लाख आदिवासी महिलांसाठी जीवन विमा योजना जाहीर करण्यात आली.
 
मानकर ट्रस्टच्या विशेष बैठकीत ‘2026 परिवर्तन रोडमॅप’ सादर करण्यात आला. या आराखड्यात आरोग्य सेवा, शिक्षणाची गुणवत्ता, कौशल्य प्रशिक्षण आणि आर्थिक सक्षमीकरण यांचा समन्वय साधण्यावर भर देण्यात आला आहे. बैठकीस संस्थेचे अध्यक्ष अतुल शिरोडकर, आमदार संजय पुराम, डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्यासह कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
 
महिलांच्या सुरक्षिततेकडे निर्णायक पाऊल-
आदिवासी कुटुंबांमध्ये महिलांचे स्थान महत्त्वाचे असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी जीवन विमा योजना राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात ३३ हजार विद्यार्थ्यांच्या मातांना या योजनेचा लाभ देण्यात येईल. आजारपण, अपघात अथवा आकस्मिक मृत्यूमुळे उद्भवणाऱ्या आर्थिक अडचणींमधून कुटुंबांना दिलासा देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
 
डिजिटल आरोग्यसेवेचा विस्तार-
संस्थेने मेडिसर्व्ह डिजिटल हेल्थ प्लॅटफॉर्म विकसित केला असून, त्याद्वारे आदिवासी भागातील कुटुंबांच्या आरोग्य नोंदी, प्राथमिक निदान व रुग्णालयीन संदर्भ सेवा सुलभ होणार आहेत. कमी इंटरनेट उपलब्धतेच्या भागातही ही सेवा प्रभावीपणे चालणार आहे.
 
शिक्षण, कौशल्य आणि मनोरंजनाचा समन्वय-
शिक्षण क्षेत्रात अभ्यासक्रम मानकीकरण, शिक्षकांसाठी संरचित देखरेख प्रणाली आणि टाटा स्टीलच्या सहकार्याने कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. नागपूरमध्ये आदिवासी विद्यापीठ उभारण्याचाही विचार सुरू आहे. यासोबतच मनोरंजनाच्या माध्यमातून आरोग्य व सामाजिक जनजागृती करण्यासाठी एकल इंटरटेनमेंट थिएटर्स सुरू करण्यात येणार आहेत.
 
नीती कार्डचा शुभारंभ
या बैठकीत सेवा नीती कार्ड योजनेचे उद्घाटन- करण्यात आले. या कार्डअंतर्गत वैयक्तिक अपघात विमा, रुग्णालयीन रोख लाभ, हवामानाधारित विमा, औषधांवर कॅशबॅक आणि शेतीसाठी सवलती उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाच्या शेवटी नितीन गडकरी म्हणाले, “ग्रामीण व आदिवासी समाजाचा विकास म्हणजेच देशाचा विकास. मानकर ट्रस्टचा हा उपक्रम सामाजिक सुरक्षिततेच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा आहे.”