नागपूरच्या प्रगतीचा प्रजासत्ताक दिनी संकल्प; आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांचे प्रतिपादन

26 Jan 2026 14:36:58
 
Abhijeet Chaudhary
 
नागपूर :
लोकप्रतिनिधी आणि नागपूर (Nagpur) महानगरपालिका प्रशासन यांच्यातील समन्वयामुळे शहराच्या विकासाला नव्या दिशेने गती मिळेल, असा विश्वास मनपा आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केला. ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयात आयोजित ध्वजारोहण सोहळ्यात ते बोलत होते.
 
मनपा मुख्यालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, मुख्य अभियंता मनोज तालेवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सदाशिव शेळके, उपायुक्त निर्भय जैन, मिलिंद मेश्राम, डॉ. रंजना लाडे, डॉ. मेघना वासनकर, मंगेश खवले, गणेश राठोड, राजेश भगत, अधीक्षक अभियंता लिना उपाध्ये, डॉ. श्वेता बॅनर्जी यांच्यासह अधिकारी-कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान व मनपा शाळांतील विद्यार्थी उपस्थित होते.
 
अग्निशमन दलाच्या प्लाटूनने आयुक्तांचे स्वागत केले. ध्वजारोहणानंतर जवानांनी पथसंचलन सादर केले. यावेळी डॉ. चौधरी यांनी सलामी स्वीकारत प्लाटूनचे निरीक्षण केले.
 
संबोधनात डॉ. चौधरी म्हणाले की, अलीकडे पार पडलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत नागपूरकरांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून लोकशाहीप्रती आपली निष्ठा अधोरेखित केली आहे. नागरिकांचा हा सहभाग मनपाच्या कामकाजाला अधिक लोककेंद्री बनवेल. निवडणूक प्रक्रियेत योगदान देणाऱ्या अधिकारी-कर्मचारी आणि सजग मतदारांचे त्यांनी आभार मानले.
 
मनपाच्या अमृतमहोत्सवी वर्षात नागपूरने विकासाच्या अनेक क्षेत्रांत लक्षणीय प्रगती साधली असून, विकसित शहर म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केल्याचे त्यांनी नमूद केले. अमृत योजना टप्पा १ व २ अंतर्गत पाणीपुरवठा नसलेल्या भागात जलवाहिन्या टाकणे, नवीन पाण्याच्या टाक्या उभारणे सुरू असून, भविष्यात अधिकाधिक परिसरात २४x७ पाणीपुरवठा देण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
 
नाग व पोहरा नद्यांचे प्रदूषण कमी करण्याचे उपक्रम, प्रधानमंत्री आवास योजनेतून गरिबांसाठी परवडणारी घरे, पीएम ई-बस योजनेअंतर्गत ५५० बसचा ताफा, पर्यावरणपूरक प्रकल्प, भांडेवाडीतील कचराडोंगर कमी करण्याचे काम, हॉट मिक्स प्लांटद्वारे दर्जेदार रस्ते, आरोग्यवर्धिनी केंद्रे, नवीन इंग्रजी माध्यमांच्या शाळा तसेच शहर सौंदर्यीकरणासाठी थीम गार्डन उभारणी अशा विविध योजनांची माहिती त्यांनी दिली.
 
अग्निशमन दल अधिक सक्षम करण्यासाठी १४ नवीन अग्निशमन बंब आणि ७० मीटर उंचीचा हायड्रोलिक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात येणार असून, अत्याधुनिक नियंत्रण कक्ष उभारण्याचेही नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
 
मनपाच्या ‘स्मार्ट मित्र’ चॅटबॉटद्वारे नागरिकांना मालमत्ता करासह विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येत असून, एआय तंत्रज्ञान आणि अद्ययावत संकेतस्थळामुळे प्रशासन अधिक पारदर्शक व सुलभ झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
प्रशासन बळकट करण्यासाठी प्रलंबित भरती प्रक्रिया पूर्ण करून सुमारे ४०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सफाई कर्मचाऱ्यांसाठी घरे तसेच ऐवजदार कर्मचाऱ्यांना लाड-पागे समितीच्या शिफारशींचा लाभ देण्याचे निर्णयही घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
 
कार्यक्रमात पन्नालाल देवडीया मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्यनाटिका सादर केली. यावेळी संविधान उद्देशिकेचे वाचन व कुष्ठरोग निर्मूलनाची प्रतिज्ञा घेण्यात आली.
 
प्रारंभी अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांचा शाल व तुळशीचे रोपटे देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी व शुभांगी पोहरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मनीष सोनी यांनी मानले.
 
Powered By Sangraha 9.0