Image Source:(Internet)
नागपूर :
निवडणुकांची धामधूम संपताच शहरात गुन्हेगारी घटनांनी पुन्हा डोके वर काढले असून, अवघ्या काही तासांच्या अंतराने घडलेल्या दोन खुनांनी उपराजधानी हादरली आहे. दोन दिवसांपूर्वी तहसील आणि मानकापूर परिसरात झालेल्या हत्यांनंतर, गुरुवारी रात्री पुन्हा गिट्टीखदान आणि अजनी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दोन खून झाल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिस मुख्यालयाजवळ बजरंग दलाच्या माजी शाखा अध्यक्ष हर्ष ऊर्फ गड्डू शिवानंदन पांडे (३८, रा. कामगारनगर) यांची जुन्या वैमनस्यातून निर्घृण हत्या करण्यात आली. शस्त्रांनी सपासप वार करत आरोपींनी गड्डूला रक्ताच्या थारोळ्यात पाडले आणि घटनास्थळावरून पसार झाले. गंभीर अवस्थेत गड्डूला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
पोलिस सूत्रांनुसार, गड्डू हा वाहनचालक असून तो यापूर्वी अवस्थीनगर परिसरातील बजरंग दलाच्या शाखेचा अध्यक्ष होता. गड्डू आणि बंटी ऊर्फ बुरहान शेख (रा. अवस्थीनगर चौक) यांच्यात दीर्घकाळापासून वैमनस्य होते. दोघांविरुद्ध मानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. या वादाला पैशांच्या व्यवहाराची पार्श्वभूमी असल्याचे तपासात समोर आले आहे. गड्डूच्या भावाने आरोपीच्या साथीदाराकडून काही रक्कम उचलली होती. त्यावरून काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्यानंतर धमकीचे प्रकार घडल्याचेही समोर आले आहे.
गुरुवारी रात्री हीच संधी साधत बंटीने आपल्या साथीदारांसह गड्डूवर हल्ला केला. हल्ल्याच्या वेळी गड्डूचे मित्र घाबरून घटनास्थळावरून पळाले. आरोपींनी शस्त्रांनी वार करत गड्डूची हत्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मृताच्या मित्राच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
या घटनेनंतर शुक्रवारी सकाळी बजरंग दलाचे कार्यकर्ते गिट्टीखदान पोलीस ठाण्यात जमा झाले. आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करत त्यांनी आंदोलन केले. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की, मृत गड्डूने मुख्य आरोपीच्या पानठेल्यावर सुरू असलेल्या कथित अवैध व्यवसायाला विरोध केला होता, त्यामुळेच त्याची हत्या करण्यात आली.
सलग घडणाऱ्या हत्यांच्या घटनांमुळे नागपूरमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या कार्यप्रणालीवर तीव्र टीका होत आहे.